लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासींच्या आरोग्यासाठी निष्काम भावनेतून काम करणाऱ्या डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग या दाम्पत्याला फेडरेशन आॅफ इंडियन चेम्बर्स आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘हेल्थकेअर ह्युमनिटेरियन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथे ३० ऑगस्ट रोजी‘फिक्की’ द्वारे आयोजित दहावे ‘हेल्थकेअर एक्सलन्स’ पुरस्कार व परिषदेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.आरोग्यसेवेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी २००९ पासून या पुरस्काराला सुरुवात करण्यात आली. यंदाचे या पुरस्काराचे दहावे वर्ष आहे. आदिवासी भागात केवळ आरोग्यसेवाच न देता त्यांच्या आरोग्याच्या समस्या कशा कमी करता येतील यासाठी सातत्याने संशोधन करण्याचे काम डॉ. बंग दाम्पत्य ३२ वर्षांपासून करीत आहेत. भारतातील सार्वजनिक आरोग्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. याच कार्याची दाखल घेत या दाम्पत्याला सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दोघांच्या वतीने डॉ. अभय बंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महासंघाचे सरचिटणीस दिलीप चिनॉय, कोकिलाबेन रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राच्या अध्यक्ष टीना अंबानी, केंद्रिय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल आणि दिल्लीचे लेफ्टनन्ट गव्हर्नर अनिल बैजल कार्यक्रमाला उपस्थित होते.
दारू आणि तंबाखू हे आरोग्याविरोधीभारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ ही देशातील सर्वात मोठी व्यावसायिक संस्था आहे. त्यामुळे या संस्थेद्वारे घेतल्या जात असलेल्या प्रत्येक निर्णयाला एक वजन असते. दारू आणि तंबाखू या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी अपायकारक असूनही त्यांचा व्यवसाय भारतात सर्वत्र फोफावत आहे. डॉ. अभय बंग हे शुक्रवारी याच सोहळ्यात आयोजित ‘हेल्थकेअर एट क्रॉसरोड’ या कार्यक्रमात गडचिरोली जिल्ह्यात सर्चच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या ‘मुक्तिपथ’ या उपक्रमाबाबत माहिती देणार आहेत. महासंघाची दारू आणि तंबाखूबाबत काय भूमिका असावी यावर ते आपली भूमिका मांडणार आहेत.