लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दारूबंदीची अंमलबजावणी करणे ही शासनाची पर्यायाने मंत्र्यांची जबाबदारी आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून विजय वडेट्टीवार यांनी काही दिवस जबाबदारी सांभाळली आहे. त्या कालावधीत दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी केली नसल्याने ते स्वत:ला अपयशी मंत्री म्हणून घोषित करतील काय, असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी उपस्थित केला आहे.
राज्यभरात कोरोनाची साथ आहे. ही साथ निवारणाऐवजी अचानक दारूबंदी उठविण्यातच का रहस्य लपले आहे. ड्रग्जविरोधी कायदा असतानाही मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचे जाळे पसरले आहे. त्यामुळे ड्रग्जबंदी कायदा अपयशी ठरला म्हणून तो उठवाल काय? स्त्री अत्याचार व बलात्कारविरोधी कायदा असतानाही बलात्कारासारख्या घटना घडतात. बंदी असतानाही सुगंधीत तंबाखू विकला जाते. सुगंधीत तंबाखूची अंमलबजावणी राज्यभरात अयशस्वी दिसते. त्यामुळे हे कायदे रद्द कराल काय? किंवा ते उठविण्यासाठी समिती स्थापन का करीत नाही, असा प्रश्न डॉ. अभय बंग यांनी उपस्थित केला आहे.