लोकमत न्यूज नेटवर्कघोट : दारू पिऊन बस चालविणाऱ्या चालकावर घोट पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.प्रभाकर सावरकर (३७) असे एसटी चालकाचे नाव आहे. सदर बस गडचिरोली आगाराची आहे. ही बस घोट येथे रात्री मुक्कामी होती. सकाळी ६ वाजताच्या दरम्यान विकासपल्लीला जातो, असे सांगून बस नेली. वाटेत चालक व वाहकाने दारू प्राशन केली. चालकाने प्रमाणापेक्षा अधिकची दारू ढोसली होती. त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटत होते. बस वाकडीतिकडी चालवत होता. ही बाब रेगडी पोलिसांच्या लक्षात आली. पोलिसांनी बस थांबवून चालक प्रभाकर सावरकर याला पोलीस मदत केंद्रात नेले. त्यानंतर त्याला चामोर्शी येथे वैद्यकीय तपासणीसाठी आणले. सावकर यांनी मोठ्या प्रमाणात दारू पिली असल्याचे सिध्द झाल्यानंतर त्याच्यावर मोटार वाहन कायद्याचे कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दुपारी उशीरापर्यंत बस पोलीस मदत केंद्रासमोरच होती.दुर्गम भागात मुक्कामी राहणाºया बसचे चालक व वाहक सकाळीच मोहाची दारू ढोसतात. नशेच्या अवस्थेत बस चालविल्याने अपघात घडतात. पोलिसांच्या या कारवाईमुळे दारू पिऊन बस चालविण्याच्या प्रकारांवर आळा बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दारू पिऊन एसटी बस चालविणाऱ्यावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 6:00 AM