गडचिरोली : हेमलकसा येथे पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांच्याद्वारा उभारलेल्या लोकबिरादरी प्रकल्पाला आज गुरुवारी (दि.२३) ४८ वर्ष पूर्ण झालीत. आदिवासी विकासासाठी अविरत कार्यरत असणाऱ्या, अनेकांसाठी प्रेरणादायी आणि सामाजिक कार्यासाठी ऊर्जा देणाऱ्या या प्रकल्पाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. प्रकाश यांनी बाबांचे सेवाकार्य पुढे नेण्याचा संकल्प केल्यानंतर त्यांना आदिवासींची सेवा करण्यास सांगण्यात आले होते. त्यासाठी सरकारने त्यांना हेमलकसा येथे ५० एकर जागा दिली. त्यावेळी या भागात रोड, वीज, घरे इत्यादी काहीच सुविधा नव्हत्या. अशा परिस्थितीत आमटे दाम्पत्याने विविध अडचणी व संकटांना तोंड देऊन आदिवासी सेवेचे नवीन जग तयार केले. बाबांच्या विचारांतून आणि आशिर्वादाने साकारलेल्या या रोपट्याचे वटवक्षात रुपांतर झाले असून प्रकल्पाने आज ४८ वर्ष पूर्ण केली आहेत.
या वर्धापन दिनानिमित्त येथे नवीन व्यायमशाळेच्या इमारतीचे उद्घाटन आणि आर्ट रुमचे उद्घाटन प्रसिद्ध सायकलपटू डॉ. अमित समर्थ आणि संस्थेचे ट्रस्टी जितेंद्र नायक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याशिवाय येथील रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
डॉ.प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते डिजिटल स्वरूपातील 'समर्पित बिरादरी' या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. प्रकाशन झाल्यावर हा अंक लोक बिरादरी प्रकल्पाच्या वेब साईटवर वाचण्यास उपलब्ध असेल. पुढील ३ दिवस शाळेतील विद्यार्थ्यांचे खेळ होतील. 26 डिसेंबर रोजी कर्मयोगी बाबा आमटे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण होणार असल्याचे प्रकल्पाच्या वतीने अनिकेत आमटे यांनी सांगितले.