लोकमत न्यूज नेटवर्क वैरागड : येथील ग्रामपंचायत चौकापासून ते पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर भूषण धनकर यांच्या पानठेल्यापासून नाल्या असूनदेखील रस्त्याने पाणी वाहत आहे; पण याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होते. याउलट दुसरीकडे सरकारकडून मिळालेल्या निधीची विल्हेवाट लावण्यासाठी केवळ सिमेंट रस्त्याचे काम केले जात आहे. आधीच नाल्या तुंबल्या आहेत, सिमेंट रस्त्यावरून पाणी वाहत आहे. त्याची देखभाल केली जात नाही, तर सिमेंट रस्ते बांधून उपयोग काय? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
वैरागड येथे स्थानिक प्रशासनाचा धाक न राहिल्याने लोक नाल्यामध्ये कचरा आणून टाकतात. नाल्यावर जळावू काड्या, शेतीचे साहित्य ठेवतात त्यामुळे मजुरांना नाल्या उपसता येत नाही त्यामुळे नाल्या तुंबल्या आहेत. ज्या नाल्या मुजरांकरवी उपसल्या गेल्या त्यातही परिसरातील लोक केर कचरा नाल्यात टाकत असल्याने त्या नाल्या पुन्हा बुजल्या आहेत.
ग्रामपंचायत चौकापासून तर पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या बायपास सिमेंट रस्त्यावर मागील अनेक दिवसांपासून पावसाळा नसतानादेखील पाणी वाहत आहे. या परिसरातील काही नळधारकांच्या नळाला तोट्या नसल्याने त्यांच्या व्यक्तिगत दुर्लक्षितपणामुळे पाण्याचा अपव्यय होतो आणि तो पाणी रस्त्याने वाहत जात आहे. पण याचे त्या नळधारकांना काही देणे-घेणे नाही.
गावात काही वॉर्डात पाण्याचा अपव्य होत असताना वैरागड येथील रामा खरवडे, केशव गेडाम, चंद्रकांत खरवडे, श्यामसुंदर खरवडे यांच्यासह परिसरातील २० कुटुंबांना मागील महिनाभरापासून पाणी मिळत नसून पाण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागत आहे. वैरागड हे आरमोरी तालुक्यातील मोठे गाव असले तरी या गावाच्या शाश्वत विकासासाठी प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होताना दिसून येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे.
पाइपलाइनच्या कामात फुटली नाली
- वैरागडच्या गांधी चौकातील सुरेश लांजिकर ते चंद्रकांत खरवडे यांच्या घरापर्यंतची नाली मागील वर्षभरात पासून उपसण्यात आली नाही.
- सिमेंट रस्त्याचे बांधकाम करताना तसेच नळ योजनेची पाइपलाइन टाकण्याच्या कामादरम्यान ही नाली ठिकठिकाणी फुटली आहे.
- या नालीतील घाणपाणी लोकांच्या अंगणात जात आहे. त्यामुळे सदर नालीचा उपसा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.