झिंगानूर : परिसरातील बोड्या व तलाव पूर्णपणे कोरडे पडले असल्याने धानपीक करपायला लागले आहे. यावर्षीही उत्पन्न होणार नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. झिंगानूर परिसरात हलके, मध्यम व जड प्रतीच्या धानाची लागवड केली जाते. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. याची पुनरावृत्ती यावर्षी होईल याचा अंदाज बांधून शेतकऱ्यांनी जड धानाची लागवड केली. जड धानाचा दर्जा चांगला राहत असल्याने या धानाला बाजारपेठेत चांगला भाव मिळतो. त्याचबरोबर जड धानाचे उत्पादनही हलक्या धानापेक्षा जास्त होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी यावर्षी जड धानाला प्राधान्य दिले. मात्र अपेक्षेप्रमाणे यावर्शी पाऊस पडला नाही. सुरूवातीचे टाकलेले पऱ्हे पाण्याअभावी करपले. त्यानंतर कर्ज काढून शेतकऱ्यांनी धान पिकाचे बियाणे खरेदी केले व धानाची रोवणी केली. मागील दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारली आहे. सुरूवातीला शेतकऱ्यांनी तलावातील व बोड्यांमधील पाणी धानपिकाला देऊन वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तलावांमधील जलसाठाही पूर्णपणे संपला आहे. परिणामी कर्जेली, किष्टयापल्ली, कोर्लामाल, कार्लाचेक, कोपला, पुल्लीगुड्डम, अमडेली, पातागुड्डम, रायगुड्डम, पेंडालय्या, सिरकोंडा, गंगनूर, कोत्तागुड्डम, रोमपल्ली, झिंगानूर, झिंगानूर माल, झिंगानूर चेक, मंगीगुड्डम, वडधेली, येडचेली, रमेशगुड्डम आदी २१ गावांमधील धानपीक करपायला लागले आहे. अनेक शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज काढून धानपिकाची रोवणी केली. धानाचे उत्पादन होणार नसल्याने कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. झिंगानूर परिसरातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता या परिसरात दुष्काळ जाहीर करून शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, परिसरातील शेतकऱ्यांना रोजगार मिळावा यासाठी रोहयोची कामे सुरू करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
झिंगानुरातील धान करपले
By admin | Published: November 10, 2014 10:43 PM