गडचिरोली : आलदंडी नदीवरुन एटापल्लीला अवैधरित्या रेती वाहतूक करताना ट्रॅक्टर उलटून चालक जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी रात्री २ च्या सुमारास घडली. अशोक पुगांटी एटापल्ली (२०) असे मृत चालकाचे नाव आहे.
एटापल्लीवरुन ७ कि.मी अंतरावर एटापल्ली - गट्टा मार्गावर आलदंडी नदीवरुन सर्रासपणे अवैध रेती वाहतूक सुरू असते. मंगळवारी रात्रीच्या सुमारास एटापल्ली येथील धीरज मंडल याच्या मालकीच्या ट्रॅक्टरवरून रेती नेली जात होती. दरम्यान, तुरमगुंडा ते एटापल्ली मार्गावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटून ट्रॅक्टर पलटी झाला. यात चालक ट्रॅक्टरखाली दाबल्या गेला. तो एकटाच असल्याने बाहेर येणे शक्य झाले नाही व त्याचा तेथेच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. अपघातात ट्रॅक्टरची टाॅली व इंजन वेगवेगळे झाले होते. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकवर गुन्हा दाखल केला. अवैध रेती वाहतुकीची केस असल्याने याबाबत महसुल विभागाकडे माहिती पाठविली जाईल अशी माहीती ठाणेदार विजयानंद पाटील यांनी दिली.
दरम्यान, गेल्या काही काळापासून या नदीवरुन मोठ्या प्रमाणात रेतीची अवैधरित्या तस्करी सुरू आहे. मात्र, वन व महसुल विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.