संजय तिपाले/गडचिरोली : यंदा सरासरीपेक्षा जिल्ह्यात पाऊस कमी आहे. दोन दिवसांपासून तुरळक ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली आहे. तरीही शहराजवळील कटाणी नदी तुडूूंब भरुन वाहत असून पाल नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने गडचिरोली- महामार्गावरील वाहतूक १५ सप्टेंंबर रोजी सकाळी सात वाजेपासून बंद आहे.
जिल्ह्यात गतवर्षी पुराचा जबर तडाखा बसला होता. वैनगंगा, प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक पाणी आल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. यंदा मात्र, मध्यप्रदेशातील संजय सरोवर, महाराष्ट्रातील गोसेखुर्द, तोतलाडोह आणि धापेवाडा या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने गडचिरोलीला याचा फटका बसण्यास सुरुवात झाली आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.
या धरणांमधून ६.५० लाख क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी थेट वैनगंगेला येत असल्याने गडचिरोलीत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आरमोरी मार्गावरील पाल नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने गडचिरोली-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. त्यामुळे दोन्ही टोकांवर वाहनांच्या एक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. धरणातून असाच विसर्ग सुरू राहिल्यास जिल्ह्यातील इतर मार्गही बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.