महसूल बुडाला : प्रशासकीय इमारतीत कार्यालयाचे स्थानांतरण चामोर्शी : येथील दुय्यम निबंधक कार्यालय भाड्याच्या इमारतीमधून महसूल मंडळाच्या प्रशासकीय भवनात स्थानांतरित करण्यात आले. परंतु दूरसंचार विभागाने इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली नसल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार व नोंदणीची कामे ठप्प पडली आहेत. यामुळे महसुलात कमालीची घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चामोर्शी येथील दुय्यम निबंधक कार्यालय मागील १० वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत होते. मात्र या ठिकाणी जागा अपुरी असल्याने या कार्यालयाला प्रशासकीय भवनात जागा उपलब्ध करून द्यावी, असे पत्र जिल्हाधिकारी यांनी २१ मार्च २०१७ रोजी दिले होते. या पत्राची दखल घेऊन प्रशासकीय इमारतीत दुय्यम निबंधक कार्यालयासाठी दोन खोल्या उपलब्ध करून देण्यात आल्या. या कार्यालयातील व्यवहार आॅनलाईन होत असल्याने इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे पत्र दुय्यम निबंधक कार्यालयाच्या वतीने १५ मार्च व २७ एप्रिल रोजी दिले होते. मात्र इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली नाही. चिचडोह प्रकल्प भूमिअधिग्रहण नोंदणीचे काम सुरू आहे. यासाठी अनेक नागरिक दुय्यम निबंधक कार्यालयात येत आहेत. मात्र काम होत नसल्याने नागरिकांना परत जावे लागत आहे. बीएसएनएल विभागाने इंटरनेट लाईन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कर्मचारी व नागरिकांकडून होत आहे. याबाबत चामोर्शी येथील दूरसंचार विभागाचे कनिष्ठ दूरसंचार अधिकारी एल. एस. चावरे यांच्याशी संपर्क साधला असता, केबलसाठी अंतर लांब असल्याने लिड लाईन टाकण्यास मंजुरी मिळाली नाही. कार्यालयाने रेडिओ मॉडेलद्वारे इंटरनेट सुविधा प्राप्त करून घ्यावी, असे दुय्यम निबंधक कार्यालयाला सूचविल्याचे म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)
इंटरनेट सुविधेअभावी खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प
By admin | Published: May 04, 2017 1:39 AM