क्रिष्णा गजबे यांचे प्रतिपादन : गौैतम बुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण देसाईगंज : अज्ञान, अंधश्रद्धा, गरिबी, दारिद्र्य यामध्ये खितपत पडलेल्या बहुजन समाजाला प्रगतीचा मार्ग दाखविण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. हे सर्व करताना अनंत हालअपेष्टा बाबासाहेबांना सोसाव्या लागल्या. भारतातील सामाजिक क्रांतीचे ते खऱ्या अर्थाने दूूत आहेत, असे प्रतिपादन आ. क्रिष्णा गजबे यांनी केले.कोरंभी टोला येथे अष्टांगिक बौैद्ध समाजाच्या वतीने शुक्रवारी भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण व धम्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना आ. क्रिष्णा गजबे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत कोरंबी टोलाचे सरपंच कुंडलिक कुळसंगे, डॉ. ई. एल. रामटेके, डॉ. हरिदास नंदेश्वर, सुधीर साधवानी, सीताराम नाकाडे, मदन साखरे, ऋषी वंजारी, साधू नाकाडे, जाफर शेख, नसीर जुम्मन शेख, डॉ. भारत लाडे आदी मान्यवर उपस्थित होते. आ. क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते भगवान बुद्धाच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मनोहर चंद्रीकापुरे यांच्या हस्ते पार पडले. पुढे मार्गदर्शन करताना आ. क्रिष्णा गजबे म्हणाले की, मनुने केलेल्या कठोर आणि जुलमी कचाट्यात सापडून बहुजन समाजाच्या अनेक पिढ्या भरकडल्या गेल्या. या समाजाने धर्माच्या नावावर पिंजऱ्यासमान बंधिस्त असलेल्या जातीच्या अंधारात शतकानुशतके अकारण आजन्म कारावास भोगला. भारतीय समाजाला वेठीस धरून या समाजाची प्रगती खुंटविण्याचे काम ज्या मनुस्मृतीने केले होते. तो ग्रंथ जाळण्याचे धारिष्ठ्य बाबासाहेबांनी दाखविले, असे प्रतिपादन केले. यावेळी अनेक मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. भीम गर्जनेत धम्म रॅली काढण्यात आली. सामूहिक बुद्ध वंदना, भोजन दान, प्रवीण देशमुख यांचे कीर्तन तसेच सामूहिक कार्यक्रमही पार पडले.कार्यक्रमासाठी अष्टांगिक बौद्ध समाज व समता सैनिक दलाच्या सदस्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
बाबासाहेबांमुळेच बहुजनांची प्रगती
By admin | Published: October 22, 2016 2:09 AM