पत्रकार परिषद : वालदे व टेंभुर्णे कुटुंबीयांचा आरोपगडचिरोली : कोरची तालुक्याच्या अलोंडी येथील आपण रहिवासी आहोत. आपचे गाव ९० टक्के नक्षल समर्थक आहे. आम्ही सुशिक्षित दलित कुटुंबीय आहोत. वारंवार आम्ही नक्षलवाद्यांचा विरोध करीत असल्याने नक्षलवाद्यांनी आमच्या दलित कुटुंबांना टार्गेट करून आमच्या घरातील सामानांची नासधूस केली. कुटुंबीयांना ओलीस धरून ठेवले. रोखरक्कम, दागदागिने नक्षलवाद्यांनी पळवून नेलेत, असा आरोप अलोंडी येथील हरिराम वालदे व उत्तम टेंभुर्णे व त्यांच्या कुटुंबीयांनी बुधवारी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत केला. पत्रकार परिषदेला गौतम हरिराम वालदे, हरिराम वालदे, सोनू रवींद्र वालदे, बायजाबाई टेंभुर्णे आदी उपस्थित होते. २२ जून रोजी बुधवारला ललिता, सोनू वालदे या दोन बहिणी आपल्या आजीसोबत घरी होत्या. रात्री १२.३० वाजताच्या सुमारास बंदूकधारी नक्षलवादी व गावातील काही नक्षलसंघटनेचे काम करणाऱ्या युवकांनी घराच्या दाराला बळजबरीने ठोकून प्रवेश केला. यावेळी ३० ते ४० नक्षलवाद्यांनी आमच्या घराला पूर्णत: घेराव केला. ललिता, सोनू व त्यांच्या आजीला मारहाण करून घराबाहेर काढले. त्यानंतर गावाच्या बाहेर एका झाडाखाली थांबविले. तर याचदरम्यान दुसरीकडे आमचे नातेवाईक असलेल्या बायजाबाई टेंभुर्णे यांच्या घरीसुद्धा काही नक्षली गेले व त्यांनी तेथील सामानाची नासधूस केली. त्यानंतर ललिता व सोनू या दोन बहिणींला छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील मिसपिरी गावाजवळ ओलीस ठेवले. येथून त्यांनी कशीबशी सुटका करून मोहला येथे पोहोचले. त्यानंतर ललिता व सोनू यांनी राजनांदगाव गाठले. तिथे त्यांचा भाऊ शालिक वालदे आल्यावर आम्ही कोटगुल पोलीस ठाण्यात २३ जून रोजी जाऊन या घटनेची तक्रार दाखल केली. या सर्व घटनाक्रमात अलोंडी येथील दुधराम सहारे, लखम कुंजाम, सुनील वालदे हे तिघेजण तोंडावर काळे दुपट्टे बांधून बंदूका घेऊन होते. हे तिघेजण घराशेजारीच राहत असल्याने आम्ही त्यांना आवाजावरून ओळखलो, असे ललिता व सोनू वालदे यांनी सांगितले. नक्षलवादी व गावातील त्यांच्या समर्थकांनी आमच्या दोन्ही कुटुंबाच्या घरून धान्य, तांदूळ, रोख रक्कम व सोन्याचे दागिने गावातीलच दोन ट्रॅक्टरद्वारे घेऊन गेले, असे त्यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली. (प्रतिनिधी)
दलित असल्यानेच नक्षलवाद्यांकडून आपण टार्गेट
By admin | Published: June 30, 2016 1:33 AM