गडचिराेली : ‘गाव तिथे एसटी’ व ‘हात दाखवा, एसटी थांबवा’ हे ब्रीदवाक्य घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यभर बससेवा सुरू केली. पण, प्रवाशांच्या सोयीसाठी असलेली दूरध्वनी सेवा मात्र काही दिवसांपासून बंद आहे. जिल्हा मुख्यालयातील एसटीचे विभाग नियंत्रण कार्यालय आणि आगारातील दूरध्वनी पूर्णत: बंद झाल्याने एसटी बसेसची चाैकशी करायची कशी? असा सवाल प्रवाशांपुढे निर्माण झाला आहे.
गडचिराेली जिल्हा मुख्यालयी एसटीचे विभागीय कार्यालय आहे. या विभागांतर्गत ब्रह्मपुरी, अहेरी व गडचिराेली असे तीन आगार येतात. या तीन आगारांच्या बसगाड्या विदर्भातील पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये चालतात. तसेच तेलंगणा - छत्तीसगड अशी आंतरराज्यीय वाहतूक केली जाते. सर्वसामान्य लाेकांकडून एसटीला प्रवासासाठी माेठी पसंती आहे. मात्र, गडचिराेली येथील विभागीय कार्यालय व बस आगारातील सर्वच दूरध्वनी क्रमांक बंद असल्याने प्रवाशांची मोठी अडचण होत आहे. बसेसबाबतची चौकशी करायची कुठे? असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.
दीड वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या वतीने गडचिराेली शहरातून धानाेरा मार्गाचे खाेदकाम करून सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. बस आगारापुढेही हा मार्ग आता वाहतुकीसाठी तयार झाला आहे. हा मार्ग तयार करताना खाेदकामादरम्यान बीएसएनएलच्या दूरध्वनी सेवेची भूमिगत लाईन पूर्णत: तुटली. तेव्हापासून केबल व या लाईनची दुरुस्ती करण्यात आली नाही. परिणामी एसटीतील दूरध्वनी बंद पडल्याचे समजते.
(बाॅक्स...)
बीएसएनएल कार्यालयाची उदासीनता
गडचिराेली आगाराच्या वतीने रस्ता खाेदकामादरम्यान केबल तुटल्याने दूरध्वनी सेवा बंद असल्याबाबतची तक्रार गडचिराेली येथील बीएसएनएल कार्यालयाकडे करण्यात आली. त्यानंतर निवेदन देऊन अधिकाऱ्यांपुढे ही समस्या मांडण्यात आली. एस. टी.च्या अधिकाऱ्यांनी दूरध्वनी सेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र, बीएसएनएल प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. परिणामी एसटीचे सर्व दूरध्वनी क्रमांक बंद पडले आहेत.
(काेट...)
दूरध्वनी सेवा बंद असल्याबाबत आपण बीएसएनएलच्या कार्यालयाला पत्राद्वारे कळविले आहे. मात्र, दुरुस्तीचे काम अजूनही करण्यात आले नाही. त्यामुळे चाैकशी विभागासह सर्वच ठिकाणचे दूरध्वनी क्रमांक बंद आहेत.
- प्रदीप सालोडकर, प्रभारी आगार प्रमुख, गडचिराेली
(बाॅक्स...)
या ठिकाणचे क्रमांक बंद
गडचिराेली एसटीच्या परिसरात तीन ठिकाणी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक आहेत. यामध्ये विभाग नियंत्रक कार्यालय, डेपाे मॅनेजर तसेच प्रवाशांसाठी असलेला चाैकशी विभाग, असे तीन स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक आहेत. याशिवाय डीपीओ म्हणजे आस्थापना व वाहतूक शाखेमध्ये तेच क्रमांक असून, त्यावरून संपर्क साधला जाताे. या सर्व ठिकाणचे दूरध्वनी क्रमांक गेल्या दीड वर्षापासून बंद आहेत.