पाणीपुरवठा योजनांची कामे थंड बस्त्यात
कुरखेडा : जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनांच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र मध्यंतरी निधीच मिळाला नसल्याने अनेक योजनांचे काम बंद पडले आहे. तर काही काम कंत्राटदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे थांबले आहे. काही दिवसांतच उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या योजनांची कामे त्वरित मार्गी लावावी.
बसस्थानक परिसरात खासगी टॅक्सींचे अतिक्रमण
धानोरा : गडचिरोली-धानोरा-मुरूमगाव मार्गावर सध्या चारचाकी व दुचाकी वाहनांची वर्दळ वाढली आहे. धानोराचे बसस्टँड रस्त्यालगतच आहे. स्वतंत्र जागा नसल्याने काळीपिवळी टॅक्सी व इतर खासगी बसेस या ठिकाणी अतिक्रमण करून दररोज अनेक प्रवासी बसवून वाहतूक सुरू आहे.
कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण द्या
गडचिरोली : ऑनलाइन वेतन देयक तयार करण्यासाठी नेट कनेक्टिव्हिटीसोबतच संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र अनेक शाळांमधील शिक्षक तसेच लिपिकांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान नाही. शाळा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे.
कार्यालयातील थम मशीन सुरू करा
गडचिरोली : जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमधील थम मशीन बंद पडल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे उशिरा येणे सुरू झाले आहे. याचा परिणाम कामकाजावर होत आहे. त्यामुळे थम मशीन तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे.
निस्तार डेपो देण्याची मागणी
चामोर्शी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने गावात त्वरित निस्तार डेपो देण्याची मागणी होत आहे. चामोर्शी भागातील नगारिकांना सांस्कृतिक कार्यक्रम व अंत्यविधीसाठी इतर ठिकाणाहून लाकडे आणावी लागत आहेत.
प्रसूतिगृह निर्मितीचे बांधकाम रखडले
अहेरी : तालुक्यातील उपकेंद्रांमध्ये प्रसूतिगृह निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र यातील काही उपकेंद्रातील प्रसूतिगृहांचे बांधकाम रखडले आहे. संस्थेअंतर्गत प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी सदर प्रसूतिगृहांचे बांधकाम होणे गरजेचे आहे. दुर्गम भागात अतिशय गंभीर स्थिती आहे. येथे दळणवळणाच्या साधनांचाही अभाव असल्याने महिलांना प्रसूतीसाठी नेताना अडचणी येतात.
चातगाव-रांगीमार्गे अवैध वाहतूक जोरात
चातगाव : चातगाव-रांगीमार्गे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे. खासगी वाहनांनी प्रवासी वाहतूक होत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. या भागात उपप्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी मोहीम सुरू करावी.
मंजूर टॉवर तत्काळ बांधण्याची मागणी
गडचिरोली : बीएसएनएलने गडचिरोली जिल्ह्यात नवीन ९० टॉवर मंजूर केले आहेत. या टॉवरचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी होत आहे. बीएसएनएलने टॉवर उभारल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना मोबाइल सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, बीएसएनएललाही उत्पन्नाचे साधन मिळणार आहे.
सेवायोजन कार्यालयातील गर्दी ओसरली
गडचिरोली : पूर्वी येथील सेवायोजन कार्यालयातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी मुलाखतपत्र पाठविण्यात येत होते. मात्र आता ऑनलाइन नोंदणी झाल्यामुळे बेरोजगार नोंदणी करण्यासाठी कार्यालयात येत नाही. त्यामुळे सेवायोजन कार्यालय कुचकामी ठरल्याचे दिसून येते.
तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंड बस्त्यात
गडचिरोली : गोकुळनगरालगतच्या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले होते. मात्र सौंदर्यीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले नाही. त्यामुळे या तलावात आता अतिक्रमण वाढले असून, अस्वच्छता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंड बस्त्यात आहे.
गडचिरोली शहरात हॉटेलांची संख्या वाढली
गडचिरोली : शहरात हॉटेलची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे खवय्यांची चंगळ झाली आहे. यापूर्वी गडचिरोली शहरात काही निवडकच हॉटेल मालकांची मक्तेदारी होती. मात्र ग्राहक नवीन हॉटेलकडे वळल्याने आजपर्यंत मक्तेदारी करणाऱ्या हॉटेलमधील ग्राहकांची संख्या रोडावली आहे. हॉटेलमधील स्पर्धेमुळे ग्राहकांना चांगली सेवा मिळण्यास मदत होत आहे.