यावर्षीच्या पावसाळ्यात पहिला पाऊस अगदी वेळेवर पडला. त्यामुळे धानाचे पऱ्हे सुरुवातीलाच टाकण्यात आले. पऱ्हे टाकून आता जवळपास एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. आठ दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या काही भागात थोडाफार पाऊस झाला. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी तसेच ज्या शेतकऱ्यांचे शेत सखल भागात आहे अशा शेतकऱ्यांनी धान रोहिणीच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र मागील पाच दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. दिवसा कडक ऊन पडत असल्याने धानाच्या बांद्यांमधील पाणी आटायला सुरुवात झाली आहे. परिणामी रोहिणीची कामे रखडली आहेत. धान लावणीच्या कामाला उशीर झाल्यास उत्पादनात घट होत असल्याचा दरवर्षीचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. यावर्षीही पाऊस लांबल्यास उत्पादनात घट होऊ शकते. कृषी विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार जिल्हाभरात केवळ सहा हजार हेक्टरवर राेवणीची कामे आटोपली आहेत.
बाॅक्स
उकाड्याने नागरिक त्रस्त
यावर्षी माेठा पाऊस अजूनही झाला नाही. एखादी तास पाऊस पडल्यानंतर लगेच ऊन निघते. त्यामुळे तापमान वाढत आहे. पाऊस व कडक ऊन यामुळे उकाड्यात वाढ आहे. दिवसा व रात्रीही उकाडा जाणवत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.