पाच वर्षांपूर्वी पितृछत्र हरविले : मेंढ्यातील दोन बहिणींवर संकट लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : घरात अठराविश्व दारिद्र्य, त्यातच पाच वर्षांपूर्वी पितृछत्र हरविले. त्यानंतर गेल्या दहा वर्षांपासून दुर्जर आजाराने ग्रासलेली आई. अशा प्रतिकूल व विपरित परिस्थितीशी संघर्ष करून मिळेल ते काम करून आपल्या दोन मुलीसह जीवन जगत असताना अंजनाबाई आकोजी भोयर यांनी अखेरचा श्वास घेतला. अंजनाबाईच्या निधनाने त्यांच्या दोन मुली निराधार झाल्या. ही व्यथा आहे, गडचिरोली शहरापासून सात किमी अंतरावर असलेल्या मेंढा (बोदली) येथील भोयर कुटुंबाची. मेंढा येथील आजाराने ग्रस्त असलेल्या अंजना आकोजी भोयर यांचे निधन झाल्याने त्यांच्या पश्चात असलेल्या सुनीता व अनिता या दोन मुली निराधार झाल्या. सुनीता ही १४ वर्ष वयाची असून अनिता ही १६ वर्ष वयाची आहे. पाच वर्षांपूर्वी सुनीता व अनिता यांचे वडील आकोजी भोयर यांचे निधन झाले. ऐन शिक्षण घेण्याच्या काळात सुनीता व अनिता या दोन बहिणींना मोलमजुरीचे कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याची पाळी आली. विटा उचलण्यापासून तर मिळेल ती मजुरीची कामे करून त्यातून मिळणाऱ्या पैशातून आई अंजनाबाई हिच्या रोगाचे निदान व औषधोपचाराचा खर्च या दोन बहिणी करीत होत्या. याशिवाय कुटुंबाचा गाडा चालविण्याची जबाबदारीही या दोन बहिणींच्या खांद्यावर येऊन पडली. नियतीच्या वक्रदृष्टीमुळे सुनीता व अनिता या दोन बहिणींचे पितृ व मातृछत्र हरविले. त्यानंतर या दोन्ही बहिणी पोरक्या व निराधार झाल्या आहेत. त्यांना आता आधार देण्याची गरज आहे. मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन पितृ व मातृछत्र हरविलेल्या सुनीता व अनिता भोयर या दोन बहिणी पूर्णत: निराधार झाल्या आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पुढील जीवन कसे व्यतीत करावे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. त्यांना सांभाळण्यासाठी कुणीही नाही. त्यामुळे त्यांना सेवाभावी संस्था तसेच दानशूर व्यक्तीकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच सामाजिक संघटनांनी निराधार झालेल्या सुनीता व अनिता यांना आर्थिक मदत करावी, असे आवाहन आहे. दोन्ही बहिणींनीच दिला अग्नी आई अंजनाबाई भोयर यांचे निधन झाल्यानंतर अंत्यसंस्काराचा कार्यक्रम पार पडला. मात्र भाऊ तसेच नातेवाईक नसल्याने या दोन बहिणींनाच आपल्या आईच्या मृतदेहाला अग्नी द्यावा लागला. एका बहिणीने हातात हंडी व दुसऱ्या बहिणीने सूप घेऊन आईला अखेरचा निरोप दिला.
मातृछत्र हरविल्याने सुनीता व अनिता झाल्या निराधार
By admin | Published: May 18, 2017 1:50 AM