राज्याकडून नियोजनाची गरज : पर्यटकांची संख्या वाढणारसिरोंचा : महाराष्ट्र व तेलंगणा राज्याच्या सामंजस्य करारानुसार सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीवर मेडिगड्डा सिंचन प्रकल्प होणार आहे. या सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील जमीन सिंचनाखाली येण्याबरोबरच जलपर्यटनाला चालना मिळण्याचीही आशा आहे. गडचिरोली जिल्ह्यासह विदर्भाच्या जिल्ह्यामधील अनेक नागरिक गोदावरी नदी पात्रातून डोंग्याने प्रवास करीत कालेश्वरचे दर्शन घेतात. कालेश्वरपासून जवळच मेडिगड्डा हा सिंचन प्रकल्प तेलंगणाच्या मार्फतीने बांधला जाणार आहे. सदर सिंचन प्रकल्प अतिशय मोठा आहे. कालेश्वरचे दर्शन घेण्याबरोबरच पर्यटकांचे पाय मेडिगड्डा धरणाकडेही वळणार आहे. सिरोंचा तालुक्यात आल्यानंतर पर्यटकांना मेडिगड्डा, कालेश्वर बघायला मिळणार असल्याने पर्यटकांची संख्या पूर्वीच्या तुलनेत आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचा फायदा उचलण्यासाठी राज्य शासनाने नियोजनबध्द पध्दतीने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्याचबरोबर सिरोंचा तालुक्यात आलेल्या पर्यटकाला जंगल पर्यटनाचाही लाभ होण्यास मदत होणार आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी मेडिगड्डा प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील १५ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या दृष्टीनेही प्रयत्न होणे अत्यंत गरजेचे आहे. जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनानंतर मेडिगड्डाविषयी असलेला रोष कमी झाला आहे. मेडिगड्डामुळे सिरोंचा तालुक्यातील भूजल पातळीत वाढ होणार असल्याने उन्हाळ्यात पाण्याची समस्या कमी होण्यास मदत होईल. सिंचनामुळे पडीक जमीन कृषी क्षेत्राखाली येणार आहे. दुबार पिकही घेऊ शकणार आहेत. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. (तालुका प्रतिनिधी)
मेडिगड्डामुळे जलपर्यटनास चालना
By admin | Published: May 18, 2016 1:37 AM