वाहन नाल्यात कोसळण्याचा धोका : ठेंगण्या पुलामुळे अनेकदा वाहतूक खंडीत लोकमत न्यूज नेटवर्क एटापल्ली : एटापल्ली तालुकास्थळापासून पाच किमी अंतरावर असलेल्या डुम्मी नाल्यावरील पूल मागील वर्षीपासून तुटलेला आहे. या पुलामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डुम्मी व जवेली या दोन गावातील नागरिकांना एटापल्ली येथे येण्यासाठी याच पुलावरून यावे लागते. या पुलावरून नेहमीच वाहनांची वर्दळ राहते. दहा वर्षांपूर्वी सदर पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र मागील वर्षी पुलाचा काही भाग खचला आहे. रात्रीच्या सुमारास वाहनचालकाचे लक्ष नसल्यास वाहन खड्ड्याच्या माध्यमातून नाल्यात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुलाची उंची कमी असल्याने या पुलावरून पाणी वाहत राहते. पुराचे पाणी गढूळ राहते. अनेक नागरिक अंदाजाने पूल ओलांडतात. मात्र तुटलेला पूल लक्षात न आल्यास प्रवाशी एकदम पुलाच्या पाण्यात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्याची विनंती अनेकवेळा करण्यात आली आहे. मात्र अजूनपर्यंत काम हाती घेतले नाही. किमान तुटलेला पूल त्यांनी दुरूस्त करावा, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीच पूल तुटला होता. मात्र उन्हाळ्यात दुरूस्त केले नाही. आता पावसाळ्यात पुन्हा पुलावरून पाणी वाहून जाऊन पूल अधिकच उखडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मोठे पाईप टाकण्यात आले आहेत. सभोवतालचे पुलाचे बांधकाम निघून गेल्यास पाईपही वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुलाचे बांधकाम करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्याची मागणी आहे.
डुम्मी नाल्यावरील पूल धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:22 AM