लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे आणि कमी दाबाचा वीजपुरवठा असल्याने त्याचा फटका येथील पाणीपुरवठा नळ योजनेला बसत आहे. नळ योजना कुचकामी असल्याने नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. विजेच्या समस्येमुळे जलकुंभ भरणाऱ्या मोटार सुरू होत नाही. परिणामी नळातून पाणीपुरवठा करणे कठीण झाले आहे. ग्रामपंचायत असतानापासून आरमोरीकर पाणी टंचाईचा सामना करीत आहेत. मात्र नगरपरिषद होऊनही पाण्याचा प्रश्न अजूनपर्यंत मार्गी लागला नाही. त्यामुळे उन्हाळ्यात आरमोरीत पाणी पेटू लागले आहे.उन्हाळ्याची सुरुवात होताच दरवर्षी मोठ्या प्रमाणात आरमोरीकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. गेल्या कित्येक दिवसांपासून पाणी समस्येने डोके वर काढले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी व दैनंदिन वापरासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी शहरातील नागरिकांना भरउन्हात आता वणवण फिरण्याची वेळ आली आहे. आधीच एक दिवसाआड शहरात आळीपाळीने पाणीपुरवठा केला जात होता. त्यात पुन्हा विजेच्या समस्येने भर घातली आहे. शहरात दोन ते तीन दिवसांआड आळीपाळीने पाणीपुरवठा केला जात आहे.
विजेवरील उपकरणे कुचकामीआरमोरी शहराला वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. वैनगंगा नदीपात्रालगत लावण्यात आलेली विद्युत जोडणी सिंगल फेजची आहे. विद्युत दाब कमी राहात असल्यामुळे जलकुंभ भरण्यासाठी लावलेले विद्युत यंत्र सुरूच होत नाही. त्यातल्या त्यात उन्हाळ्याची सुरुवात झाल्यापासून शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे विद्युत यंत्रणेवर चालणारी उपकरणेही खराब होत आहेत.
नगर परिषद आरमोरीतर्फे शहराला पाणीपुरवठा करण्यास आपण तत्पर आहोत. परंतु विद्युत विभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे पिण्याच्या पाण्याचे जलकुंभ भरत नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण झाली आहे. मी पाणीपुरवठा सभापती असल्यामुळे शहरातील रहिवाशांचा रोष मला सहन करावा लागत आहे. रीतसर विद्युत पुरवठा झाला तर पाण्याची अडचण भासणार नाही. - विलास पारधीपाणीपुरवठा सभापती, नप आरमोरी