गडचिरोली : अहेरी तालुक्यातील सूरजागड प्रकल्पातील बेसुमार गौणखनीज उपसा व वाहतुकीमुळे रस्त्यालगतची उभी पिके धोक्यात आली आहेत. या भागात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. हे पीक धुळीने काळवंडू लागले आहे. २४ एप्रिलला परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत गाऱ्हाणे मांडले.
सूरजागड प्रकल्प कधी धूळ, प्रदूषणामुळे वादाच्या भोवऱ्यात आहे. या प्रकल्पातून लोहखनिजाची रात्रंदिवस उपसा व वाहतूक सुरु आहे. रेाज हजारो जड वाहनांची आलापल्ली ते आष्टी या मार्गावर वाहतूक सुरु आहे. त्यामुळे मद्दीगुडम, आलापल्ली, सुभाषनगर, खमनचेरू, बोरी, लगाम, शांतिग्राम या गावांच्या शेतीला फटका बसू लागला आहे. मार्गालगत कापूस उत्पादन घेणारे शेतकरी हवालदिल आहेत. कापसावर धुळीचे कण साचत असल्याने मालाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासह अहेरीचे उपविभागीय अधिकारी अंकित, तहसीलदार फारुख शेख, अहेरी ठाण्याचे पो.नि. किशोर मानभाव यांना निवेदन दिले. नुकसान झाल्याने हेक्टरी अडीच लाख रुपये भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. भरपाई न दिल्यास १० मे पासून उपोषणाला बसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.