लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नगर परिषद व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण घेतलेल्या गडचिरोली येथील सोनापूर कॉम्प्लेक्स वॉर्डातील पियूष सुधीर चिवंडे यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली आहे. त्याचे हे यश गडचिरोली जिल्ह्यातील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.पियूषने पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण गडचिरोली येथे राहूनच घेतले. त्यानंतर पुणे विद्यापीठातून बीटेकचा अभ्यासक्रम करून पदवी मिळविली. पदवी प्राप्त होताच त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी पुणे येथेच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच वर्षी पियूष एमपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण करून मुलाखतीपर्यंत पोहोचला. मुलाखतीमध्ये कमी गुण मिळाल्याने त्याची निवड झाली नाही. दुसऱ्या वर्षी ऐन परीक्षेच्या वेळी आजारी पडला. तिसऱ्या वेळी त्यांनी उपजिल्हाधिकारी पदाची परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला असून उपजिल्हाधिकारी पदासाठी पियूष निवड झाली आहे. यापूर्वी त्याची भारतीय रेल्वेमध्ये सुद्धा निवड झाली आहे. मात्र तो त्याठिकाणी रूजू झाला नाही. यूपीएससीच्या परीक्षेतही मागील वर्षी मुलाखतीपर्यंत मजल मारली होती.पियूषचे वडील सुधीर चिवंडे हे देसाईगंज वनविभागाच्या कार्यालयात अधीक्षक पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झाले तर आई आरडी एजन्ट आहे. पियूषला आयएएस बनण्याची ईच्छा असून उपजिल्हाधिकाऱ्यांची नोकरी करूनही तो यूपीएससीची तयार करणार आहे, अशी माहिती पियूषच्या वडिलांनी दिली आहे.
जिल्हा परिषद शाळेत शिकलेला पियूष बनला उपजिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 12:50 AM