देसाईगंज - स्थानिक रेल्वे भूमिगत पुलाच्या दुभाजकावरील पूर्णपणे वाळलेले झाड अपघातास आमंत्रण देत आहे. झाडावर जाहिरातीचे फलक लावणे आरंभल्यापासून अपघाताची भीती अधिक बळावली आहे. नगरपालिका झाड तोडण्याच्या मानसिकतेत आहे. मात्र वनविभाग या मृतझाडालासुद्धा तोडू देत नसल्याचे सत्य समोर आले आहे.
रेल्वेमुळे दोन भागांत विभाजित झालेल्या शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने लाखांदूर व कुरखेडा या रस्त्यांना जोडणारा भूमिगत रेल्वे पूल तयार केला. मात्र, या पुलाच्या बांधकामाच्या वेळेपासूनच मृतप्राय झालेले अवाढव्य झाड तोडण्याची तसदी रेल्वे प्रशासनाने घेतली नाही. पुलाच्या दुभाजकाच्या अगदी मधोमध असलेले हे झाड अपघाताला निमंत्रण देत आहे. काही महिन्यांपूर्वी नगरपालिकेचे उपाध्यक्ष माेतीलाल कुकरेजा यांनी झाडाला काढण्याविषयी प्रयत्न चालविले होते. मात्र मृतप्राय असूनही वनविभागाने झाड काढण्यासाठी सहकार्य केले नाही. सध्या तर रस्त्याच्या मधोमध असल्याने जाहिरातीचे फलकदेखील मोठ्या प्रमाणात या झाडावर लावले जात आहेत. त्यामुळे चारचाकी वाहनांना अनेक वेळा ते अडचणीचे होते. पूर्णपणे मृत असलेले हे झाड एखादे वेळी उन्मळून पडल्यास मोठा अपघात होण्याची भीती वर्तविली जात आहे.