लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आचारसंहितेमुळे तेंदूपत्ता कंत्राटांच्या लिलावाची प्रक्रिया अपूर्ण राहिल्या आहेत. याचा गैरफायदा काही कंत्राटदारांकडून घेतला जात असून गावातील दलालांना हाताशी धरून अत्यंत कमी किंमतीत करारनामे करून ग्रामसभांची दिशाभूल केली जात आहे.काही ग्रामपंचायतींनी आचारसंहितेपूर्वीच तेंदूपत्त्याचा लिलाव आयोजित केला होता. मात्र कंत्राटदारांनी या लिलावात सहभाग घेतला नाही. कंत्राटदारांनी संघटना तयार केली असून या संघटनेने सुरूवातीचे दोन ते तीन वेळा लिलावात सहभाग घ्यायचा नाही, असे ठरविले आहे. तेंदूपत्त्याला फारशी मागणी नाही व किंमतही नाही, असा आभास कंत्राटदारांकडून निर्माण केला जात आहे. त्याचप्रमाणे आचारसंहिता पुढे एक महिना कायम राहणार असल्याने या कालावधीत करारनाम्याची प्रक्रिया न झाल्यास ग्रामसभांचे नुकसान होईल, अशीही चुकीची माहिती ग्रामसभांना दिली जात आहे.दलाल व कंत्राटदाराच्या चुकीच्या माहितीला गावातील नागरिक बळी पडत आहेत. मागील वर्षीपेक्षाही कमी किंमतीने करारनामे केले जात आहेत. यामुळे ग्रामसभांचे मोठे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी ज्या कंत्राटदारांनी मजुरी व रॉयल्टीची रक्कम बुडविली, याच कंत्राटदारांनी आपल्या नातेवाईकांच्या नावाने कंपन्या स्थापन केल्या आहेत. आपल्या एखाद्या नातेवाईकाला किंवा दिवाणजीला पाठवून करारनामे केले जात आहेत. त्यामुळे यावर्षीही रॉयल्टीची रक्कम बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामसभांनी कंत्राटदारांच्या या फसव्या धोरणापासून सावध राहण्याची गरज आहे.स्वत: तेंदूपत्ता संकलन करणे ठरणार फायद्याचेग्रामसभांनी स्वत: तेंदूपत्ता संकलन करून त्याची विक्री करावी, या मुख्य उद्देशानेच ग्रामसभांना शासनाने तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार दिले आहेत. मात्र काही ग्रामसभांनी यातून मार्ग काढत तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार कंत्राटदाराला देण्यास सुरूवात केली. यातून ग्रामसभांना थोडाफार निधी मिळत असला तरी कंत्राटदार मात्र कोट्यधीश झाले आहेत. तेंदूपत्ता व्यवसायात मंदी आहे, असे सांगून मागील वर्षी कंत्राटदारांनी तेंदूपत्ता लिलावात सहभाग घेतला नाही. त्यानंतर पडल्या किंमतीला तेंदूपत्ता खरेदी केला. हाच डाव याही वर्षी आखला जात आहे. मागील वर्षी कंत्राटदारांच्या भूलथापांना बळी न पडता काही ग्रामसभांनी स्वत:च तेंदूपत्ता संकलन केले होते. त्यांच्या तेंदूपत्त्याला चांगली किंमत मिळाल्याने लाखो रुपयांचे अधिकचे महसूल प्राप्त झाले. जिल्ह्यातील इतरही ग्रामसभांनी या ग्रामसभांचे अनुकरण करून स्वत: तेंदूपत्ता संकलन करणे फायद्याचे ठरणार आहे.
तेंदूपत्ता कंत्राटदारांकडून ग्रामसभांची दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:02 AM
लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : आचारसंहितेमुळे तेंदूपत्ता कंत्राटांच्या लिलावाची प्रक्रिया अपूर्ण राहिल्या आहेत. याचा गैरफायदा काही कंत्राटदारांकडून घेतला जात ...
ठळक मुद्देआचारसंहितेच्या नावावर लूट : कमी किमतीत केले जात आहेत करारनामे