शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांच्या अद्ययावत व वास्तविक स्थितीबाबत माहिती व्हावी या हेतूने शासनाकडून ई-पीक पाहणी ॲप कार्यान्वित करण्यात आले. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकाची अचूक माहिती यात भरावी लागत आहे. परंतु याबाबत संबंधित विभागाने कुठल्याही प्रकारची जागृती व मार्गदर्शन केले नाही. ॲप हाताळण्याबाबत शेतकरी अनभिज्ञ असताना व तांत्रिक अडचणी येत असतानाही सिराेंचा तालुक्यात महसूल व कृषी विभागाने उपाययाेजने संदर्भात कोणतीच पावले अजूनपर्यंत उचलली नाही. अनेक शेतकरी सुशिक्षित युवकांकडून मदत घेऊन नाेंदणी करीत आहेत. याशिवाय एका तलाठ्याकङे पाच ते सात गावांचा कारभार असतो. पीक पाहणी करताना अचूक नोंद हाेत नसल्याबद्दल शेतकऱ्यांची ओरड आहे. त्यामुळे कृषी सहायकांना प्रशिक्षण देऊन गावांतध्ये जागृती करावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
मास्टर ट्रेनर काय कामाचे?
ई-पीक पाहणी माेबाईल अप्लिकेशन हाताळताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी साेडविण्यासाठी व मार्गदर्शनासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर शासनाने मास्टर ट्रेनर नियुक्त केला आहे; परंतु गडचिराेली जिल्ह्यात मास्टर ट्रेनर काेण? याबाबतच शेतकऱ्यांना माहीत नाही. तलाठी व कृषी सहायकसुद्धा याबाबत अनभिज्ञ आहेत. शासनाने नियुक्त केलेले मास्टर ट्रेनर शेतकऱ्यांना याेग्य वेळी कामात
येत नसतील तर ते काय कामाचे? असा संतप्त सवाल तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.