दिलीप दहेलकर/काैसर खान, गडचिरोली/सिराेचा, लोकमत न्यूज नेटवर्क: गडचिराेली जिल्हयातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भाग असलेल्या सिरोंचा तालुक्यात २८ ऑक्टोबर रोजी शुक्रवारला रात्री १२.४५ वाजताच्या सुमारास भूकंपाचे साैम्य धक्के जाणवले असून रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.८ इतकी होती. सदर भूकंपात काेणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याची माहीती प्रशासनाकडून मिळाली आहे.
सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर, टेकडा, बामणी, रोमपल्ली तसेच अहेरी तालुक्यातील उमानूर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले असून परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. दुर्गम भाग सिरोंचा तालुक्यातील तंमदाला, मेडाराम येथे भूकपाचे धक्के जाणवले. अहेरी तालुक्यातील रोमपल्ली, उमानूर येथेही धक्के जाणवले. हा भाग महाराष्ट्रातील असून तेलंगणा राज्यातील सीमावर्ती भागात असल्यामुळे तेलंगाना राज्यात कोलमाइंस भागातून महाराष्ट्रात धक्के आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. एक वर्षापुर्वी बामणी व टेकडा भागात भूंकपाचे ६.९ तीव्रतेचे धक्के जाणवले होते.