गडचिरोली : वनवैभवाने नटलेल्या जिल्ह्यात आरोग्यदायी रानभाज्यांची कमी नाही. पावसाळा सुरू होताच रानभाज्या शहरात विक्रीसाठी दाखल होत आहेत. ताज्या, लुसलुशीत रानभाज्यांना शहरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. .
शेतशिवारात, जंगलात किंवा डोंगराळ भागामध्ये या भाज्या वाढतात. या भाज्या नेमकेपणाने ओळखून अनेक महिला बाजारात त्या विक्रीसाठी घेऊन येतात. ग्रामीण भागातून सध्या शहरात रानभाज्या विक्रीसाठी आणल्या जात आहेत. या रानभाज्यांना विशेष मागणी असल्याचे दिसून येते.
बोपली
बोपली या रानभाजीला उंदीरकानी / मूषककर्णी असेही म्हटले जाते. जुलै ते सप्टेंबर या कालावधीदरम्यान ही भाजी उपलब्ध होते. ही भाजी रक्तवाढीसाठी उपयुक्त आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे अॅन्टिऑक्सिडेंटयुक्त गुणधर्म असतात.
लाल माठ
लाल माठ भाजीला लाल भाजी, श्रावणी माठ असेही म्हटले जाते. या भाजीची.. कोवळी पाने व कोवळे देठ खाण्यायोग्य असतात. जुलै-सप्टेंबर या कालावधीत जंगलात उपलब्ध असते. लोह, अ, ब, व क आदी कॅल्शिअम, मॅग्रेशिअम, फॉस्फरस, झिंक आहेत.
बांबू
बांबूच्या भाजीला वेळ, वास्ते, काष्ठी, कळक, माणगा असेही म्हटले जाते. बांबूचे कोवळे कोंब म्हणजेच वास्ते होत. बांबूमध्ये जीवनसत्त्व व कॉम्प्लेक्स - थायामीन, रिबोफ्लेविन, नियामिन, बी-६, (नायरीडॉक्सिन) आणि पॅटोथिनिक अॅसिड, पोटॅशियम, कॅल्शियम आहेत.
गुळवेल
गुळवेलाला वारुडवेल, अमृतवेल, अमृतवली गुडूची असेही म्हटले जाते. या भाजीची कोवळी पाने खाल्ली जातात. ही भाजी वर्षभर उपलब्ध असते. या भाजीमध्ये कॅल्शिअम, जीवनसत्त्व अ आणि क, प्रथिने, लोह, फॉस्फरस, तंतूमय पदार्थ व अॅन्टिऑक्सिडेंट आहेत.
तरोटा
तरोटा या रानभाजीला टाकळा, तरवटा, चक्रमर्द आदी नावानेसुद्धा ओळखले जाते. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव कॅशिया टोरा आहे. ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. ती पौष्टिक व वातनाशक आहे.
रोगप्रतिकार शक्ती व डायटरी फायबर तसेच सर्व प्रकारची सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळण्याकरिता रानभाज्या खाव्यात; पण त्यांची अन्न म्हणून ग्रहण करण्याची एक पातळी आहे. कोवळ्या अवस्थेतील रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर असतात.
- नीलिमा पाटील, सहायक प्राध्यापक तथा विषयतज्ज्ञ कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली