लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : प्राथमिक अवस्थेत मानव कंदमुळे, भाज्या यांचा आपल्या आहारात अधिक उपयोग करीत हाेता. कालांतराने तो समुहाने राहू लागला. त्यामुळे त्याच्या खानपान पद्धतीत बदल झाला. सध्या रानभाज्यांचा वापर कमी झाला असला तरी माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी रानभाजी उपयुक्त आहे. त्यामुळे रानभाजी विक्रीतून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास शक्य आहे, असे प्रतिपादन आ. डॉ.देवराव होळी यांनी केले.कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र गडचिराेली व तालुका कृषी कार्यालय चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका कृषी कार्यालय चामोर्शी येथे १३ ऑगस्ट रोजी आयोजित रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.देवराव होळी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी कदम, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, कृषी अधिकारी वसंत वळवी, प्रभारी तालुका कृषी अधिकारी नेहा फरांदे, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, तालुका उमेद अभियान व्यवस्थापक विनोद बोबाटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक वसंत वळवी, संचालन तालुका तंत्रज्ञ व्यवस्थापक हेमंत उंदीरवाडे तर आभार श्रीनिवास रनमले यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, शेतकरी, बचतगटाचे सदस्य उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कृषी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
या भाज्यांचा हाेता स्टाॅलवर समावेश- रानभाजी महोत्सवात २६ महिला बचतगट, २४ पुरुष बचतगट, १६ वैयक्तिक बचतगट सहभागी झाले होते. रानभाज्यांमध्ये काटवल, दिंडा, तरोटा, कुडा, आमबुशी, पातूर, शेवगा, धोपा, केना, पानाचा ओवा, कपाळफोळी, बांबू, खापरखुटी, कुरडू, आघाडा, काटेमाट, चिवळ, घोडभाजी, अंबाडी, मटारू, पिंपळ, भुई आवळा, सुरण, कवठ, उंबर आदींचा समावेश हाेता.