गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनमुळे तेलाच्या कंपन्या तीन ते चार महिने बंद हाेत्या. काेराेना लाॅकडाऊनपासून खाद्यतेलाचे भाव सतत वाढत आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस सर्वच खाद्यतेलाचे भाव प्रतिकिलाे ७० ते ७५ रुपयांनी वाढले आहेत. खाद्यतेल महागल्याने सर्वसामान्य कुटुंबप्रमुख व गृहिणी हैराण झाले आहेत.
गेल्या महिनाभरापासून काेराेना संसर्गाची दुसरी लाट विदर्भासह राज्यात आली आहे. नागपूर शहरात काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण वाढल्याने येथे बरेच निर्बंध घालण्यात आले आहेत. परिणामी मालाच्या वाहतुकीवरही नियंत्रण आले आहे. याचा परिणाम नागपूरच्या बाजारपेठेतील सर्वच किराणा खाद्यतेल व इतर मालांचे भाव वाढले आहेत. याचा परिणाम गडचिराेली शहरातील बाजारपेठेवर झाला आहे. गडचिराेली शहर व जिल्ह्यात नागपूर येथून ठाेक स्वरूपात किराणा व इतर माल येताे. काेराेना संसर्गामुळे काही महिने कंपन्या बंद राहिल्याने त्या ताेट्यात गेल्या. परिणामी त्यावेळचा ताेटा भरून काढण्यासाठी व कंपनी पूर्वपदावर आणण्यासाठी उद्याेजकांनी खाद्यतेलाच्या भावात वाढ केली. परिणामी किरकाेळ व ठाेक स्वरूपाच्या सर्वच प्रकारच्या खाद्यतेलाच्या किमती मागील वर्षीच्या तुलनेत ७० रुपयांनी वाढल्या आहेत.
काेट...
काेराेना संकटामुळे सर्वसामान्य कुटुंब अडचणीत आली आहेत. त्यात महागाई प्रचंड वाढल्याने सर्वसामान्य गृहिणींचे आर्थिक बजेट काेलमडले आहे. अत्यावश्यक असलेल्या खाद्य तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने दरराेज लागणाऱ्या भाजीची फाेडणी आता महागली आहे.
- शुभांगी बाेरकुटे, गृहिणी
.......
राेजच्या भाजीसाठी तसेच देवाच्या दिव्यासाठी लागणाऱ्या तेलाचे भाव वाढले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी तेलाचे भाव प्रचंड वाढले आहेत. पूर्वी आमचा महिनाभराचा किराणा सामान अडीच हजार रुपयांमध्ये हाेत हाेता. आता साडेतीन ते चार हजार रुपयांवर हा आकडा पाेहाेचला आहे. खाद्यतेल व इतर साहित्याचे भाव वधारल्याने अडचण जाणवत आहे.
- गाेपिका मुनघाटे, गृहिणी
...............
अत्यावश्यक वस्तू व किराणा मालाच्या किमतीवर सरकारचे मुळीच नियंत्रण नसल्याचे सध्याच्या भडकलेल्या महागाईवरून दिसून येत आहे. सामान्य लाेकांच्या उदरनिर्वाहाचा विचार करून अत्यावश्यक व स्वयंपाकगृहात लागणाऱ्या सर्व वस्तूंच्या किमती कमी हाेणे आवश्यक आहे.
- जया बांगरे, गृहिणी
............
काेराेना लाॅकडाऊनमुळे किराणा मालाच्या वाहतुकीवर निर्बंध आले. काेराेनामुळे नागपुरात बरीच बंधने आली आहेत. तेथील बाजारपेठेवर परिणाम झाल्याने खाद्य तेलासह किराणा मालाच्या किमती भडकल्या आहेत.
- इकबाल सुराणी, किराणा व्यापारी