लोकमत विशेषअहेरी : आदिवासी विकास विभागाच्या अहेरी प्रकल्पांतर्गत देचलीपेठा येथील शासकीय प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेचा गेल्या सात महिन्यांपासून वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. माध्यमिक विभागाला केवळ एकच शिक्षक कार्यरत असून इतर विषयांच्या तासिका होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याशिवाय या आश्रमशाळेत नानाविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पालकवर्गात संतापाची भावना निर्माण झाली आहे.देचलीपेठा शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. या शाळेत सर्व वर्गाचे मिळून ३०० विद्यार्थी शिक्षण घेत असून नियमित पाच शिक्षक व मानधन तत्वावरील दोन शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांअभावी या आश्रमशाळेत गणित विषयाचे तास सोडून इतर विषयांच्या अभ्यासक्रमाच्या अध्यापणाला सुरूवातच झाली नसल्याची माहिती आहे. एक ते चार वर्गासाठी दोन शिक्षक, पाच ते सात वर्गासाठी केवळ एक शिक्षक कार्यरत आहे. यातील एका शिक्षकाकडे सदर आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांचा प्रभार सोपविण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून वीज पुरवठा खंडीत असल्याने येथील विद्यार्थ्यांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. सद्य:स्थितीत नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून वीज जोडणी घेण्यात आली असून संपूर्ण शाळेला विद्युत पुरवठा नाही. पावसाळ्याचे दिवस असल्याने साप, विंचू व इतर सरपटणारे प्राण्यांपासून विद्यार्थ्यांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आश्रमशाळेत लाखो रूपये खर्च करून जनरेटर बसविण्यात आले. मात्र सदर जनरेटर वापरात नसल्याने त्याचा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना लाभ नाही. (प्रतिनिधी)
देचलीपेठा आश्रमशाळेत शिक्षणाचा बट्ट्याबोळ
By admin | Published: August 03, 2015 1:09 AM