गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला मिशन लाइफचा नारा दिला आहे. मिशन लाईफ ही भारताच्या नेतृत्वाखालील जागतिक जन चळवळ आहे. जे पर्यावरणाचे रक्षण आणि जतन करण्यासाठी वैयक्तिक तसेच सामुदायिक कृतीला प्रोत्साहन देते. मिशन लाईफमध्ये सामील होऊन आपण जागतिक हवामान कृतीत योगदान देऊ शकतो तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून मातृभाषेतून शिक्षण घ्यायला हवे असे आवाहनही केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी केले.
केंद्रीय कामगार व स्वयंरोजगार आणि पर्यावरण वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी २३ जुन राेजी गोंडवाना विद्यापीठाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बाेलत हाेते. याप्रसंगी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरूश्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन, अधिष्ठाता डॉ.चंद्रमौली, नव संशोधन केंद्राचे संचालक मनीष उत्तरवार, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, उपवनसंरक्षक निलेश शर्मा तसेच प्रशासनाचे इतर अधिकारी,अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रममधील वनवासी हितरक्षाचे प्रमुख गिरीश कुबेर , सृष्टी संस्थेचे संचालक केशव गुरनुले, प्रा. रुपेंद्र गौर, ग्रामसभेचे सदस्य आदी उपस्थित होते.
गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी सामाजिक दायित्वातून गौणवन उपजाच्या क्रिया कलापांशी ग्रामसभा क्षमता सक्षमीकरण व प्रशिक्षण केंद्र गोंडवाना विद्यापीठ आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने ११ एप्रिल २०२२ पासून सुरू झाले आहे. स्थानिकांनी कोणत्या गोष्टी संकलन आणि साठवणूक करून त्याच्या विक्रीत प्रावीण्य कसे मिळवता येईल, पेसा कायदा म्हणजे, काय जैवविविधता, मनरेगा अशा सगळ्या गोष्टी ग्रामस्थांना अवगत होण्यासाठी हा प्रकल्प सुरू असल्याचे त्यांनी सांगितले तसेच विद्यापीठ आपल्या गावात या उपक्रमाविषयी त्यांनी मंत्री महोदयांना अवगत करून दिले.