अशोक नेते यांचे प्रतिपादन : अहेरीत कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन थाटात; दोन हजार शेतकऱ्यांची उपस्थिती गडचिरोली : विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्न करीत आहेत. अधिकाऱ्यांनी योजनांची माहिती देण्यासाठी तालुका व महसूल मंडळ स्थळी मेळावे घेऊन परिपूर्ण माहिती द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेता येईल. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. कृषी विभाग व आत्माच्या संयुक्त विद्यमाने अहेरी येथील हॉकी मैदानावर आयोजित दोन दिवशीय कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन पार पडले. यावेळी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, तर अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक उपस्थित होते. मंचावर आमदार डॉ. देवराव होळी, जि.प. सभापती माधुरी उरेते, अहेरीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, आत्माचे प्रकल्प संचालक प्रकाश पवार, उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती, एटापल्लीचे एसडीओ डॉ. विपीन इटनकर, सीआरपीएफचे द्वितीय कमांडंट जितेंद्र कुमार, पं.स. सदस्य हर्षवर्धन आत्राम, उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात धरती अॅग्रो केमिकल्स, जैन इरिगेशन सिस्टीम लि., तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम, बचत गट, सप्तरंगी फॉमर प्रोड्युसर कंपनी, कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था मलकापूर, कृषी उत्पन्न बाजार समिती अहेरी, रेशीम संचालनालय नागपूर, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ चंद्रपूर तसेच इतर शासकीय विभागाचे मिळून ६० स्टॉल लावण्यात आले होते. विविध कृषी योजनांची माहिती, साहित्य, अवजारे, तसेच कृषी यंत्राची माहिती या स्टॉलद्वारे देण्यात आली. अहेरी, सिरोंचा भामरागड व एटापल्ली या चार तालुक्यातून जवळपास दोन हजार नागरिक उपस्थित होते. संचालन तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले. आभार अहेरीचे तंत्र अधिकारी संजय वाकडे यांनी मानले. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी) आमदारांनी मेळाव्यात घेतला आढावा आमदार डॉ. देवराव होळी यांनी सदर शेतकरी मेळाव्यात भाषण करताना शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांकडून घेतली. तसेच शेतकऱ्यांना बऱ्याचशा योजनांची माहिती व या योजनांचा उपयोग होत नसल्याचे कळताच आमदार डॉ. होळी यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी खासदार अशोक नेते यांच्याकडे केली. कृषी विभागाच्या योजनासंदर्भात शेतकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसाद नकारात्मक असल्याने स्थानिक कृषी अधिकारी मेळाव्यात समोर येत नसल्याचे प्रकर्षाने दिसून आले. या बाबीची मेळाव्यात अनेक जण चर्चा करीत होते.
शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यास प्रयत्नशील
By admin | Published: April 17, 2017 1:36 AM