गडचिरोली : सिराेंचा वन विभागातील कमलापूर वनपरिक्षेत्र मुख्यालयात राज्यातील एकमेव हत्तीकॅम्प आहे. येथे कार्यरत सर्वच आठ हत्तींना चाेपिंग म्हणजेच वैद्यकीय कारणांसाठी २ जानेवारीपासून १२ दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील सुटीच्या नियाेजित दिवसांत कॅम्पमधील हत्तींचे दर्शन पर्यटकांना हाेणार नाही.
वाढत्या थंडीमुळे हत्तींच्या तळपायाला भेगा पडतात. चालताना त्यांना त्रास होतो. त्या भेगांवर आणि दुखऱ्या पायांवर उपचारासाठीच हत्तींना वैद्यकीय सुट्टी देण्यात आली आहे. अशा प्रकारची सुट्टी त्यांना दरवर्षीच देण्यात येते. या दिवसात त्यांच्या पायांना चोपिंग औषधांचा शेक दिला जातो. ही औषधी ४०-४५ प्रकारच्या जडीबुटींपासून तयार केली जाते. त्यासाठी हिरडा, बेहडा, सुंठ, त्रिफळा, जायफळ, आसमंतारा अशा वेगवेगळ्या वनस्पतींचा वापर करून एका ड्रममध्ये उकडून चोपिंगचा लेप तयार करतात. तो लेप महावत, चाराकटर हे पहाटे किंवा सकाळी हत्तींचे पाय शेकतात, अशी माहिती कमलापूरचे वन परिक्षेत्र अधिकारी नरेश चाैके यांनी दिली.
कॅम्पमध्ये काेणकाेणते हत्ती?कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये सध्या एकूण आठ हत्ती आहेत. यामध्ये अजित, मंगला, बसंती, रुपा, राणी, प्रियांका, गणेश, लक्ष्मी आदींचा समावेश आहे. या हत्तींमार्फत वन विभाग लाकडे उचलणे, अडचणीच्या भागातून वाहतूक करणे यासारखी कामे करीत हाेता; परंतु सध्या ही कामे हत्तींकडून केली जात नाहीत.
राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प पाहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून पर्यटक येतात. हत्तींच्या पायांची तसेच त्यांच्या प्रकृतीची काळजी घेता यावी यासाठी चाेपिंग केली जाते. या प्रक्रियेमध्ये हत्तींची रक्त तपासणीसुद्धा केली जाते. यामुळे सदर कालावधीत हत्ती कॅम्प बंद ठेवले आहे.-डॉ. महेश येमचे, पशु वैद्यकीय वन्यजीव अधिकारी कमलापूर