लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अहेरी तालुक्यातील जामगाव येथील नागरिकांकडून जवळपास १० लाख रुपये किमतीचे सुमारे आठ ट्रॅक्टर सागवानी लाकडाचे साहित्य आढळून आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात सागवानाचे साहित्य आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.जामगाव हे गाव आलापल्ली-आष्टी मार्गावरील चिंतलपेठ फाट्यापासून सात किमी अंतरावर आहे. सदर गाव पेडीगुड्डम वन परिक्षेत्रांतर्गत येते. जामगाव येथे मोठ्या प्रमाणात सागवान झाडांची तोड करून त्यापासून पाट्या, पलंग, दरवाजे, खिडक्या व अन्य साहित्य बनविले जात असल्याची गोपनिय माहिती वन विभागाला प्राप्त झाली. त्यानुसार वन विभागाच्या जवळपास ६० ते ७० कर्मचाऱ्यांनी १ एप्रिल रोजी जामगाव गाठून तेथील नागरिकांच्या घरांची तपासणी करण्यास सुरूवात केली. पहिल्या दिवशी जवळपास दोन ट्रॅक्टर सागवाने साहित्य आढळून आले. रात्री उशीर झाल्याने कारवाई थांबवून पुन्हा दुसऱ्या दिवशी २ एप्रिल रोजी तपासणी सुरू केली. दुसऱ्या दिवशीही काही नागरिकांच्या घरी सागवानी साहित्य आढळून आले. पुन्हा तिसºया दिवशी ३ एप्रिल रोजी जामगाव परिसरातील शेतशिवार व नाल्यांमध्ये सागवानी साहित्य आढळून आले. वन विभागामार्फत तपासणी मोहीम सुरूच असून ३ एप्रिलपर्यंत सुमारे आठ ट्रॅक्टर सागवानी साहित्य जप्त करण्यात आले आहे.१ एप्रिल रोजी कारवाई झाल्यानंतर काही नागरिकांनी घरामध्ये लपवून ठेवलेले साहित्य गावाच्या जवळ असलेल्या नाल्यांमध्ये फेकून दिले. सदर साहित्य सुध्दा जप्त करण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईत आठ ट्रॅक्टर सागवानाचे साहित्य व लाकूड आढळून आले आहेत. त्यांची किंमत जवळपास १० लाख रुपये एवढी होते. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून सात आरोपी फरार आहेत. वन विभागामार्फत तपासणी मोहीम सुरूच आहे.२४ मार्चपासून शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. याचा गैरफायदा उचलत जामगाव येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून विविध प्रकारचे साहित्य बनविण्यास सुरूवात केली होती. विशेष म्हणजे, वन विभागाचे कर्मचारी अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने त्यांना कोरोनाशी संबंधित कोणतेही काम सोपविण्यात आले नव्हते. तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असताना वन विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या ही बाब कशी काय लक्षात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.