शिष्टमंडळ भेटले : प्रदेशाध्यक्षांकडे जिल्ह्यातील काँग्रेसजणांची मागणी गडचिरोली : आगामी नगर परिषद व जिल्हा परिषदेची निवडणूक विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आ.विजय वडेट्टीवार व माजी खा. मारोतराव कोवासे यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात लढवावी, अशी मागणी गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडे केली.दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची भेट घेऊन त्यांच्याशी जिल्ह्यातील पक्ष संघटनेच्या कामाविषयी चर्चा केली. या शिष्टमंडळात प्रदेश कॉग्रेसचे सचिव रवींद्र दरेकर, सगुणा तलांडी, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, पी. आर. आकरे, बंडू ऊर्फ विनोद शनिवारे, कुरखेडा नगर पंचायत उपाध्यक्षा जयश्री धाबेकर, एटापल्ली नगर पंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार, युवक काँग्रेस प्रदेश सचिव लता पेदापल्ली, नवनाथ धाबेकर, नगरसेवक नंदू कायरकर, निलोफर शेख, एटापल्ली तालुका अध्यक्ष मनोहर हिचामी, कुरखेडा पं. स. सदस्या गीता धाबेकर, मंगला कोवे, अहेरीच्या उषा ठाकरे, शहजाद शेख, नंदू खानदेशकर, माजी नगरसेवक विलास सूर्यवंशी, इश्वर कुमरे, जिल्हा काँग्रेसचे महासचिव नरेंद्र भरडकर आदींचा समावेश होता.यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी खा. अशोक चव्हाण यांना २००९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुका आ. विजय वडेट्टीवार व मारोतराव कोवासे यांच्या नेतृत्वात लढविण्यात आल्या होत्या. तेव्हा पक्षाला गडचिरोली जिल्ह्यात १०० टक्के यश मिळाले होते. याकडे प्रदेशाध्यक्षांचे लक्ष वेधले. जिल्ह्यातील निष्ठेने वर्षानुवर्षे काम करणाऱ्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना सन्मान मिळावा, पक्ष संघटनेचे काम समन्वयाने व सर्वांना घेऊन करण्यात यावे, अशी मागणी खा. चव्हाण यांच्याकडे करण्यात आली. तसेच धानोरा नगर पंचायतीच्या निवडणुकीत आ. वडेट्टीवार व माजी खा. कोवासे यांनी ललीत बरछा यांच्या नेतृत्वात काँग्रेसने निवडणूक लढावी, अशी सूचना केलीे होती. परंतु एका नेत्याच्या हट्टापायी काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वाने ही बाब मान्य केली नाही. काँग्रेसचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला. ही बाब अनेक नेत्यांना खा. चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली. कोरची, कुरखेडा नगर पंचायतीच्या पराभवाचीही पक्षाने उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्षांकडे करण्यात आली. जिल्ह्यातील ओबीसी कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेचे नेतृत्व दिल्या गेले पाहिजे, जिल्ह्यात सर्वच पद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने ओबीसी कार्यकर्त्यांची प्रचंड कुचंबना संघटनास्तरावर होत आहे. महिला कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जिल्ह्याचे नेतृत्व काम करीत नाही, अशी भावनाही काही नेत्यांनी बोलून दाखविली. या सगळ्यांच्या भावनांचा आपण विचार करू, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शिष्टमंडळाला सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)
वडेट्टीवार-कोवासेंच्या नेतृत्वात निवडणुका लढा
By admin | Published: October 02, 2016 1:56 AM