गडचिरोली : राज्य निवडणूक आयोगाने गडचिरोली जिल्ह्यातील १० नगर पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. दोन टप्प्यात या निवडणुका घेतल्या जाणार असून पहिल्या टप्प्यात १ नोव्हेंबर २०१५ रोजी सहा नगर पंचायतसाठी मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ६ नोव्हेंबरला चार नगर पंचायतसाठी मतदान होईल. २९ सप्टेंबर २०१५ रोजी मुलचेरा, भामरागड, सिरोंचा, अहेरी, एटापल्ली, चामोर्शी या सहा नगर पंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जारी होणार आहे. १ ते ८ आॅक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र शासकीय सुट्या व रविवार वगळून स्वीकारले जाणार आहे. ९ आॅक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्राची छादनी व वैधरीत्या नामनिर्देश झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. १९ आॅक्टोबरला नामनिर्देशनपत्र मागे घेता येईल. त्यानंतर २६ आॅक्टोबर रोजी मतदान केंद्राची यादी प्रसिध्द केली जाईल व १ नोव्हेंबर २०१५ रविवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. २ नोव्हेंबरला सोमवारी सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुरूवात होईल. दुसऱ्या टप्प्यात कोरची, धानोरा, कुरखेडा, आरमोरी या नगर पंचायतीसाठी मतदान होणार आहे. ३ आॅक्टोबर रोजी या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी जाहीर करतील. ५ ते १२ आॅक्टोबर २०१५ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र देणे व स्वीकारले जातील. १३ आॅक्टोबरला नामनिर्देशनपत्राची छाननी व वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाईल. २३ आॅक्टोबरपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. मतदान केंद्राची अंतिम यादी ३१ आॅक्टोबरला जाहीर होईल. ६ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान घेतले जाणार आहे. ७ नोव्हेंबरला शनिवारी सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला प्रारंभ होईल.
नगर पंचायतीसाठी दोन टप्प्यात निवडणुका
By admin | Published: September 29, 2015 2:55 AM