कुरखेडा : रामगड-पुराडा भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या भागात तत्काळ डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यंदाच्या पावसाळ्यातही फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. नियमित फवारणीकरिता वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
शेतकरी विविध योजनांबद्दल अनभिज्ञ
देसाईगंज : कृषी, महसूल व वन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील गावांमध्ये पोहोचत नसल्याने, या भागातील अनेक शेतकऱ्यांना योजनांची माहिती नाही.
कोडसेपल्लीत समस्या सोडविण्याची मागणी
अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण जात आहे. परिणामी, जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे.
ग्रामीण भागात वीजचोरीचे प्रमाण वाढले
मूलचेरा : महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे. त्यामुळे महावितरणने लक्ष देण्याची मागणी सूज्ञ ग्राहकांकडून होत आहे. मूलचेरा तालुक्याच्या ग्रामीण भागात वीजचोरीचे प्रमाण अधिक आहे.
टिपागड परिसराला अभयारण्याचा दर्जा द्या
कुरखेडा : तालुक्यातील टिपागड अभयारण्याच्या निर्मितीच्या हालचाली मंदावल्याचे दिसून येत आहे. या अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन तीव्र गतीने करण्याची गरज आहे, शिवाय येथील वन्य जिवांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे़
दुग्ध संस्थांना आर्थिक मदतीची मागणी
गडचिरोली : अपुऱ्या दूधपुरवठ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ६२ दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी दूध उत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक मदत व मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र, शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दूध उत्पादनाला बराच वाव असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
स्नेहनगरात जंतुनाशक फवारणी करा
गडचिरोली : स्थानिक स्नेहनगरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या वाॅर्डात फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे येथे डासांची उत्पत्ती वाढली आहे. कोरोना व इतर रोगाचा संसर्ग होऊ नये, यासाठी पालिका व आरोग्य प्रशासनाने नाल्यांमध्ये जंतुनाशक फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.
कमी रेंजमुळे भ्रमणध्वनिधारक त्रस्त
आष्टी : जयरामपूर परिसरातील भ्रमणध्वनी सेवा मागील अनेक दिवसांपासून विस्कळीत होत असल्याने या भागातील विविध कंपनीच्या भ्रमणध्वनी ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनी मनोऱ्यांची रेंज वाढवावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
गोगाव नजीकचे नागोबा देवस्थान दुर्लक्षितच
गडचिरोली : येथून पाच किमी अंतरावर असलेल्या गोगावपासून दोन किमी अंतरावरील नागोबा देवस्थान व परिसराच्या विकासाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागोबा देवस्थानात दरवर्षी रथसप्तमीनिमित्त मोठी जत्रा भरते. हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र, येथे निवास, पाणी व इतर सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे भाविकांची पंचाईत होते.
रुग्णवाहिकांची संख्या वाढवा
गडचिरोली : गाव पातळीवरील रुग्णांना अतिमहत्त्वाच्या उपचारासाठी खासगी वाहनाने रुग्णालयात शहरात जावे लागते. अनेकदा वाहनेही वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांना अनेकदा आपल्या प्राणाला मुकावे लागते.
आशीर्वाद नगरात मोकाट डुकरांचा हैदोस
गडचिरोली : गोकुलनगर लगतच्या आशीर्वाद नगरात मोकाट डुकरांचा हैदोस वाढला आहे. रात्रीच्या सुमारास डुकरांच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होत आहे. याशिवाय दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा नागरिकांची झोपमोडही होते. त्यामुळे या डुकरांचा बंदोबस्त होणे आवश्यक आहे.
कोरची तालुक्यातील अनेक शाळा विजेविनाच
कोरची : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केले आहेत. मात्र, शाळेमध्ये वीजपुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळखात पडून आहेत. काही शाळांना वीजपुरवठा होता. मात्र, वीजबिल भरला नसल्याने, वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित शाळा विजेविनाच सुरू आहेत. डिजिटल साधनांचा पुरेपूर वापर करण्यासाठी शाळांमध्ये वीजपुरवठा आवश्यक झाला आहे.
घर बांधकामाचा खर्च दुपटीने वाढला
गडचिरोली : गेल्या दोन वर्षांपासून लोहा, सिमेंट, रेती, विटा, गिट्टी व इतर बांधकाम साहित्याचे भाव प्रचंड वधारले आहे. याशिवाय मिस्त्री व मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता घर व इमारत बांधकामाचा खर्च दुपटीवर वाढला आहे. तीन वर्षांपूर्वी पाच लाखांत होणाऱ्या घर बांधकामासाठी आता १२ लाखांहून जास्त खर्च लागत आहे. खर्च वाढल्याने घर बांधणारे अनेक जण कर्जात सापडले आहेत.
एटापल्ली तालुक्यातील सौरदिवे नादुरुस्तच
एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले, परंतु अनेक गावांत लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे निकामी झाले आहेत.
चामोर्शीतील तलाव सौंदर्यीकरणाच्या प्रतीक्षेत
चामोर्शी : शहरालगत असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. चामोर्शी शहरात फिरण्यासाठी व निवांत बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही, त्यामुळे शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष झाले.
जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई
आलापल्ली : गर्भवती व प्रसूत झालेल्या मातांना आर्थिकदृष्ट्या दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर याबाबत प्रचंड दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे.
ट्रॅक्टर चालकांसाठी परवाना शिबिराची गरज
एटापल्ली : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूक विषयाचे कुठलेही ज्ञान व नियम अवगत नसलेले तरुण ट्रॅक्टर चालवितात. ट्रॅक्टर उलटून आजवर जिल्ह्यात पाच ते दहा नागरिकांचा मागील पाच वर्षांत मृत्यू झाला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरधारक प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. यासाठी शिबिर घेऊन परवाने द्यावे.
कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यापूर्वी अनेकदा सदर मागणी करण्यात आली, परंतु या मागणीकडे दुर्लक्ष झाले.