देसाईगंज तालुक्यात शेकडो नागरिकांनी घरगुती वापरासाठी गेल्या ४ महिण्यांपासून मागणीपत्रानुसार, विद्युत वितरण कंपनीला देयकाचा भरणा केला. ४ महिण्यांचा कालावधी उलटूनही विद्युत ग्राहकांना मीटरची उपलब्धता नसल्याचे सांगण्यात आले. दोन ते चार भाडेकरुंचे विद्युत कनेक्शन एकाच मीटरवरून सुरू असल्याने व विद्युत वितरण कंपनीच्या १०० युनिट पेक्षा जास्त युनिटच्या वापरासाठी ज्यादा दराने लावण्यात येणारे बिल हे सरासरी पेक्षा चारपट जास्त असल्याने ग्राहकांची गळचेपी होत आहे. यातील काही जणांनी आमदार कृष्णा गजभे यांचेशी संवाद साधून सदर बाब लक्षात आणून दिली. या विषयी विद्युत अभियंता भोवरे यांचेकडे विचारणा केली असता जिल्ह्यातच विद्युत मीटरची उपलब्धता नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आ. गजभे यांनी विदर्भातील इतर जिल्ह्यातही विचारणा केली असता सगळीकडे विद्युत मीटरचीच बोंब ऐकायला मिळाली़ यावरून महावितरण कंपनी ग्राहकांकडून जास्त युनिटचे वापर करवून ज्यादा दराने वीज बिल वसूल करीत असल्याचे निदर्शनात येत असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचेशी चर्चा करून कृषिपंपाच्या विद्युत समस्येसह विद्युत मीटरच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आ. गजभे यांनी दिली.
कृषिपंपाची समस्या साेडवून वीज मीटर उपलब्ध करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 4:36 AM