कोरची (गडचिरोली) : तालुका मुख्यालय असलेल्या कोरचीपासून ३७ कि.मी.अंतरावर अतिसंवेदनशील नक्षल भागातील कोटगुल येथे सतत सुरू असलेल्या वीज पुरवठ्याच्या समस्येने त्रस्त नागरिकांनी शनिवारी ( 14 जुलै) सकाळपासून चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. भल्या पहाटे सुरू झालेल्या या आंदोलनात गावातील महिला-पुरूषांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यही सहभागी झाले आहेत.
कोटगुल येथे २०१२ मध्ये ३३ केव्ही वीज उपकेंद्र मंजूर झाले. मात्र आता सहा वर्षानंतरही ते सुरू न झाल्याने कोटगुलला वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे कोटगुलमधील नागरिकांनी शनिवारी सकाळपासून कोटगुल-मुरूमगाव, कोटगुल-कोरची मार्गावर चक्काजाम आंदोलन सुरु केले. या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा लोहम्बरे, कोरची पंचायत समितीचे उपसभापती श्रावण मातलाम, कोटगुलचे सरपंच राजेश नैताम, सोनपूरचे सरपंच नरपतसिंग नैताम, माजी पंचायत समिती सदस्य रामदास हारामी आणि परिसरातील बहुसंख्य युवक, महिला सहभागी झाले.
अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त कोटगुल परिसरात दोन पोलीस मदत केंद्र तर एक प्राथमिक आरोग्य केंद्र, दोन शासकीय आश्रमशाळा, ३१ जिल्हा परिषद शाळा आहेत, ७ ग्राम पंचायत असून ४० गावे आहेत. या परिसरात वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. या परिसरात महिन्यातून केवळ एक-दोन दिवस पुरवठा अखंडितपणे सुरू असतो, बाकीचे सर्व दिवस कधीही वीज पुरवठा खंडित होतो. याला कंटाळून या भागातील लोकांनी शनिवारी सकाळपासूनच आंदोलनाचा पवित्रा घेतला. या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांची समस्या मार्गी लावण्यासाठी दुपारपर्यंत कोणीही अधिकारी आले नव्हते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यास या परिसरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याची तयारी सुरू केली आहे.