वीज मंत्र्यांकडे केला पाठपुरावा : आमदारांच्या प्रयत्नांना यश; वीज समस्या सुटणारदेसाईगंज : तालुक्यातील शंकरपूर येथील ३३ के व्ही वीज केंद्र सुरू झाले असून या केंद्राचे उद्घाटन आ. क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी उपविभागीय वीज अभियंता संजय बोबळे, सहायक अभियंता आनंद हुकरे, हरिदास लाडे, हरडे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील विजेची समस्या लक्षात घेऊन शंकरपूर येथे ३३ केव्हीचे वीज केंद्र वीज कंपनीने उभारले होते. या वीज केंद्राचे तीन महिन्यांपूर्वीच बांधकाम पूर्ण झाले होते. मात्र आॅपरेटर व कर्मचारी नसल्याचे कारण पुढे करीत पॉवर स्टेशन सुरू केले नव्हते. याबाबत माध्यमांनीही शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आ. क्रिष्णा गजबे यांनी जिल्हा वीज अभियंता यांना वारंवार सूचना देऊन सुद्धा अधिकारी पॉवर स्टेशन सुरू करण्यास दिरंगाई करीत होते. त्यामुळे आ. गजबे यांनी जिल्हा वीज अभियंता यांना दूरध्वनीवरून फोन करून वीज केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले होते. ऊर्जा मंत्र्यांना फोन करून याबाबतची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे वीज कंपनीने शंकरपूर येथील पॉवर स्टेशन सुरू करण्यास परवानगी दिली आहे. (वार्ताहर)सभोवतालच्या गावांना लाभशंकरपूर परिसरात येणाऱ्या चोप, कोरेगाव, बाळंदा, विहीरगाव, पोटेगाव, विसोरा, तुळशी व कोकडी या गावामधील कमी दाबाच्या विजेचा पुरवठा होत असल्याने अनेक वीज उपकरणे सुरूच होत नव्हते. वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होत होता. शंकरपूर येथे वीज केंद्र सुरू झाल्याने या गावांची समस्या सुटली आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होण्याच्या त्रासापासून नागरिकांची मुक्तता झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
शंकरपूर येथील वीज उपकेंद्र सुरू
By admin | Published: June 04, 2016 1:16 AM