लाेकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : अहेरी तालुक्यातील कमलापूरचा हत्ती कॅम्प गुजरातला हलविण्याचा कुटिल डाव केंद्र शासनाकडून सुरू असून कोणत्याही परिस्थितीत हत्ती कॅम्प बाहेर जाऊ देणार नाही. केंद्र शासनाचा कुटिल डाव हाणून पाडू, असा इशारा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांनी सिराेंचा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिला. सिराेंचा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात १४ जानेवारी राेजी सायंकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख विलास कोडापे, अहेरी विधानसभा जिल्हा प्रमुख रियाज शेख, उपजिल्हाप्रमुख अरुण धुरवे, अहेरी विधानसभा संघटक बिरजू गेडाम, सिरोंचा तालुका संघटक दुर्गेश तोकला उपस्थित होते. कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये सध्या ८ हत्ती आहेत. त्यांना सांभाळण्यासाठी ४ स्थायी व ८ राेजंदारी माहुत आहेत. कमलापूरचा हत्ती कॅम्प सर्वदूर प्रसिद्ध आहे. येथे राज्यभरातून पर्यटक येत असतात. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना माहिती देऊन कोणत्याही परिस्थितीत कमलापूर येथून हत्ती कॅम्प हलवू देणार नाही, असे किशोर पोतदार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान रेपनपल्ली येथे उपवनसरंक्षक सुमित कुमार यांच्याशी पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.
...तर लाेकांच्या असंताेषाचा उद्रेक हाेईल -पंदिलवार
आष्टी : गडचिरोली जिल्ह्याच्या कमलापूर हत्ती कॅम्पमधील ७ हत्तींचे गुजरात राज्यातील जामनगर जिल्ह्यातील झूमध्ये स्थानांतरण केले जाणार आहे. याबाबतची माहिती मिळताच जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी यास विराेध केला आहे. हत्तींचे स्थानांतरण केल्यास जिल्ह्यातील लाेकांच्या असंताेषाचा उद्रेक हाेईल. ही स्थिती येण्यापूर्वी शासनाने दखल घेऊन हत्तींचे स्थानांतरण राेखावे, अशी मागणी जि. प. सदस्य तथा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष रूपाली पंदिलवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा हा वनवैभवाने समृद्ध आहे. यातच कमलापूर येथील हत्ती कॅम्प पर्यटकांचे आकर्षण आहे. त्यामुळे या जिल्ह्याला महत्त्व आहे. जिल्ह्यातील एकमेव पर्यटनस्थळ म्हणून हजारो लोक येथे येत असतात. येथील हत्तिणीने नुकतेच एका पिलाला जन्म दिला आहे. त्यामुळे हत्तींची संख्या वाढत आहे. पर्यटन वाढविण्यासाठी येथील हत्ती कॅम्पचा विकास करावा; परंतु कॅम्पमधून हत्तींचे स्थानांतरण करू नये, अशी मागणी जि. प. सदस्य रूपाली पंदिलवार यांनी केली आहे.