गडचिरोली : राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात मोकळेपणाने फिरणारा एकही जंगली हत्ती नाही. मात्र, आता छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात हत्तींचा एक कळप दाखल झाला आहे. त्यात लहान-मोठे मिळून १८ ते २३ हत्ती असल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
दरम्यान, या हत्तींमुळे मानवी जीवितास धोका नसला तरी त्यांच्या हालचालींवर वनविभागाकडून पाळत ठेवली जात आहे. जिल्ह्यात कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये ९ हत्ती आहेत; पण त्यांचे भ्रमण आणि वास्तव्य वनविभागाच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे ते एक प्रकारे पाळीव हत्तीप्रमाणे राहतात. मात्र, जंगलात कुठेही मोकळे फिरू शकणाऱ्या जंगली हत्तींचा एवढा मोठा कळप गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात प्रथमच आला आहे. धानोरा तालुक्याच्या मुरूमगावपासून छत्तीसगड सीमेकडील जंगलात गेल्या चार दिवसांपासून या हत्तींचे वास्तव्य आहे. हे हत्ती शेतातील पिकांचे नुकसान करण्याची शक्यता आहे.
फोटो काढण्यासाठी जवळ जाऊ नका
या हत्तींचे आकर्षण म्हणून लोक त्यांचा शोध घेत त्यांचे फोटो काढण्यासाठी जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतील, पण असे करणे धोक्याचे ठरू शकते. मनुष्यासाठी हा प्राणी धोकादायक नसला तरी हत्तीजवळ लोकांनी गोंधळ, आवाज केला तर त्याला असुरक्षितता वाटेल आणि अशा स्थितीत तो हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे वनअधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कुठून आले हे हत्ती?
हे हत्ती छत्तीसगडमधील बिलासपूर भागातील जंगलातून आले असण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली आहे. यापूर्वी हे हत्ती अनेक दिवसांपासून गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांच्या सीमेला लागून असलेल्या राजनांदगावच्या जंगलात होते. आता ते गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाले आहेत. हे जंगली हत्ती विशिष्ट परिसरात नेहमीसाठी राहत नसून ते नेहमी आपले ठिकाण बदलवीत असतात. गडचिरोली जिल्ह्यात पोषक वातावरण मिळाले तर या जिल्ह्यात त्यांचे वास्तव्य अनेक दिवस राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्याच्या सीमेत हत्ती येत आहेत. पण, ते २ ते ३ पेक्षा जास्त नव्हते. एवढ्या मोठ्या संख्येने हत्तींचा कळप प्रथमच आला असल्याचे उपवनसंरक्षक कुमारस्वामी यांनी सांगितले.
छत्तीसगड सीमेपासून सात किलोमीटरपर्यंत आत गडचिरोलीच्या जंगलात हा हत्तींचा कळप आला आहे. तो परत छत्तीसगड जंगलात जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यांच्या हालचालींवर वनविभागाची नजर आहे. गावकऱ्यांनी सध्या जंगलाच्या दिशेने जाऊ नये यासाठी त्यांना सतर्क करण्यात येत आहे.
- डॉ. कुमारस्वामी एस. आर.
उपवनसंरक्षक, गडचिरोली