ही मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत वेगवेगळ्या विभागांचा समावेश असणारी जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली. हा कार्यक्रम हा जिल्ह्यातील प्रत्येक गावपातळीपर्यंत राबविला जाणार आहे. त्यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका व इतर स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. त्याचबरोबर तालुकास्तरावर वैद्यकीय अधिकारी यांची चमू नेमण्यात आली आहे. गोळ्या सेवन केल्यानंतर काही गुंतागुंत निर्माण झाल्यास वैद्यकीय चमू तत्काळ औषधोपचार करण्यासाठी येईल, असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी बैठकीत सांगितले.
यावेळी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा साथरोग अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे डॉ. अमरदीप नंदेश्वर, जिल्हा नोडल अधिकारी डॉ. पंकज हेमके, डॉ. बागराज धुर्वे यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
(बॉक्स)
जिल्ह्यात हत्तीरोगाचे ३८६२ रुग्ण
- हत्तीरोग हा आजार फॉयलेरिया कृमीमुळे होतो. ही कृमी दूषित क्युलेक्स मादी डासापासून माणसाच्या शरीरात प्रवेश करते. क्युलेक्स डासाची उत्पत्ती घाण पाण्यात होते. पायावर सूज येणे, हत्तीच्या पायासारखे पाय होणे, अंडवृद्धी होणे ही हत्तीरोगाची लक्षणे आहेत.
- जिल्ह्यात आजपर्यंत हत्तीरोगाचे ३८६२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर नियमित औषधोपचार करण्यात येत आहे. तसेच एकूण १९३० अंडवृद्धी रुग्ण असून, त्यापैकी ३८९ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
- हत्तीरोगाच्या गोळ्यांच्या सेवनामुळे हत्तीरोगाच्या कृमींचा पूर्ण नायनाट होतो. ही केवळ गोळ्या वाटपाची मोहीम नसून लाभार्थ्यांला प्रत्यक्ष त्या गोळ्या खाऊ घातल्या जाणार आहे. या औषधाने कोणताही दुष्परिणाम होत नाही.