कमलापूर (गडचिरोली) :गडचिरोली जिल्ह्यातील पातानिलचे ३ हत्ती गेल्या २ सप्टेंबरला पहाटेच्या अंधारात गुजरातकडे रवाना केले असले तरी राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प असणाऱ्या कमलापूर हत्ती कॅम्पमधील ८ पैकी ४ हत्ती नेणे आता सोपे राहिलेले नाही. खुद्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह खासदार, आमदार अशा सर्वांनीच हे हत्ती नेण्यासाठी विरोधाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे हे हत्ती गुजरातला नेण्याचा निर्णय फिरविला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हे हत्ती गुजरातमधील जामनगरच्या रामकृष्ण टेम्पल एलिफंट ट्रस्टकडे दिले जाणार आहे. त्या हत्तींना तेथील प्राणिसंग्रहालयात ठेवले जाणार आहे. त्यामुळे वन्यजीवप्रेमींसह स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. हत्ती हलविण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी अनेक ठिकाणी बॅनर व पोस्टरबाजी करणे सुरू आहे. गुरुवारी त्याचाच एक भाग म्हणून गडचिरोलीतील वनसंरक्षक कार्यालयासमोर विविध पक्षांच्या वतीने निदर्शनांचे आयोजन केले आहे.
गडचिरोलीतील हत्ती स्थानांतरणाला स्थगिती मिळणार? हायकोर्टाकडून गंभीर दखल
कमलापूरचे हत्ती कुठेही जाणार नाही
मागील राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील हत्ती स्थानांतरण करण्याचा निर्णय घेतला, तो चुकीचा होता. येथील काही म्हातारे हत्ती पाठविण्यात आले परंतु कमलापूर येथील हत्ती जाणार नाही, याबाबत आदेश काढत आहे. उलट कमलापूर या ठिकाणी गार्डन बनविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
कमलापुरातील कमतरता दूर करावी
कमलापूर-पातानिल येथे हत्तींसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांची कमतरता आहे. आवश्यक पदेही रिक्त आहेत. सर्व सुविधांसाठी खर्चाचे बजेट करावे लागेल. गेल्या सरकारने त्या कमतरता दूर न करता हत्ती हलविण्यास मंजुरी दिली; पण कमलापूरचे हत्ती जामनगरला न नेता आवश्यक सुविधा देण्यासाठी मी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बोलणार आहे, असे खासदार अशोक नेते यांनी सांगितले.
- खासदार अशोक नेते
जनतेच्या भावनांशी खेळू देणार नाही
कमलापूरचे हत्ती म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचे वैभव आहे. त्यांच्याशी येथील जनतेच्या भावना जुळल्या आहेत. गेल्या सरकारच्या काळात आम्ही हत्ती हलविण्याचा निर्णय स्थगित ठेवला होता पण राज्यात सरकार बदलताच हत्ती नेण्याचे खुळ पुन्हा उभे झाले. जनतेच्या भावनाचा अनादर करून हत्ती गुजरातला नेण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा उद्रेक होईल, अशी भावना अहेरी क्षेत्राचे आमदार तथा माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केली.
- आमदार धर्मरावबाबा आत्राम