गडचिरोली : आदिवासींच्या पहिल्या महिलासाहित्य संमेलनास १५ एप्रिल रोजी सुरुवात करण्यात आली. इंदिरा गांधी चौकातून ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या नृत्याचे सादरीकरण, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला-पुरुषांसह शालेय विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले.
संमेलनाच्या मंचाला ज्येष्ठ समाजसेविका जंगोरायताड यांचे नाव दिले आहे. ज्येष्ठ साहित्यिका नजूबाई गावित यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. मेघालयच्या प्रा. डॉ. स्ट्रीमलेट डखार अध्यक्षस्थानी होत्या, तर माजी आमदार हिरामण वरखडे स्वागताध्यक्ष होते. माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. सतीश गोगुलवार, अशोक चौधरी, नंदा भील, रोहिदास राऊत, सामाजिक कार्यकर्ते मनोहर हेपट, ज्येष्ठ साहित्यिका उषाकिरण आत्राम, साहित्यिका कुसूम आलाम, केशवशहा आत्राम, अशोक श्रीमाली यांची उपस्थिती होती. साहित्य संमेलनातून १३ राज्यांतील साहित्यिकांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले.आदिवासी साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न
संमेलनाध्यक्षा प्रा. डॉ. स्ट्रीमलेट डखार यांनी गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आदिवासी महिलांचे पहिले साहित्य संमेलन होत आहे, ही प्रशंसनीय बाब असल्याचे सांगितले. आदिवासी साहित्यातून दुर्गम भागातील महिलांच्या वेदनांना वाचा फुटायला हवी. आदिवासी साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे संमेलन असून, यातून आदिवासींचा आवाज बुलंद होईल, असा विश्वास व्यक्त केला.
काळाची चाहूल ओळखा
आपलं संपूर्ण आयुष्य दुर्गम, अतिदुर्गम भागातील घनदाट जंगलात व्यतीत करणारे आदिवासी हेच जंगलाचे खरे हक्कदार आहेत. त्यांचे हक्क हिरावून घेण्याचा डाव पध्दतशीरपणे आखला जात आहे. लोहखाणींमध्ये बेसुमार उत्खनन सुरू आहे, प्रदूषण वाढत आहे, निसर्गाचे सौंदर्य हिरावले जात आहे. आदिवासींना, ग्रामसभांना न विचारता हे अतिक्रमण सुरू असल्याची खंत साहित्यिका कुसूम आलाम यांनी व्यक्त केली. काळाची चाहूल ओळखून आदिवासींनी प्रगतीकडे वाटचाल केली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.