गडचिरोली : ‘जय सेवा, जय जोहार...’ असा जयघोष करत आदिवासी दिनाच्या निमित्ताने येथील आरमोरी रोडवरील संस्कृती सांस्कृतिक भवनात एल्गार करण्यात आला. आदिवासींच्या योजना लाटण्यासाठी बिगर आदिवासींचे वाढच चाललेेले अतिक्रमण, त्यातून मूळ आदिवासींवर होत असलेला अन्याय- अत्याचार तसेच समान नागरी कायद्याचा घाट घालून अस्तित्वावरच घाला घालण्याच्या प्रकाराविरुध्द लढा द्यावा लागेल, यासाठी सज्ज राहण्याचा निर्धार करण्यात आला.
आदिवासी दिनानिमित्त ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशन व सहयोगी विविध आदिवासी संघटनांच्या वतीने ९ ऑगस्टला येथे आरमोरी रोडवरील संस्कृती सांस्कृतिक भवनात मुख्य कार्यक्रम झाला. यावेळी उद्घाटक म्हणून समाजकल्याणचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त एम. एम. आत्राम, काँग्रेसचे राज्य महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, भरत येेरमे, निवृत्त पोलिस उपायुक्त नीताराम कुमरे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी, संतोष मेश्राम यांची उपस्थिती होती.
जिल्हा निर्मितीचे शिल्पकार कै. बाबूराव मडावी यांच्या स्मारकास अभिवादन करून ९ ऑगस्टला दुपारी १२ वाजता रॅलीला सुरुवात झाली. यावेळी युवक- युवतींसह समाजबांधवांनी पारंपरिक गाेंडी भाषेतील गाण्यांवर ठेका धरला होता. ही रॅली संस्कृती सांस्कृतिक भवनात पोहोचली. तेथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन केले. मणिपूर अत्याचारातील बळी पडलेल्या पीडितांना श्रद्धांजली अर्पण केली. अमरसिंग गेडाम यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंतांसह सेवानिवृत्त कर्मचारी व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला.
रेला नृत्याने भरला जोश, टाळ्यांच्या कडकडाटात दिली दाद
दरम्यान, या कार्यक्रमात एस. आर. स्टार ग्रुपच्या कलावंतांनी पारंपरिक वेशभूषेत गाेंडी रेला नृत्य सादर केले. या नृत्याला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत दाद दिली. काही जणांनी रोख बक्षिसेही जाहीर केली. या नृत्याने वातावरणात जोश भरला.
मूळ आदिवासींच्या नावाखाली १२ हजार जणांनी लाटल्या नोकऱ्या
माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी भाषणात मूळ आदिवासींच्या नावाखाली १२ हजार बिगर आदिवासींनी शासकीय नोकऱ्या लाटल्याचा गौप्यस्फोट केला. आदिवासींना संविधानाने दिलेल्या अधिकारांवर गदा आणण्याचे षडयंत्र कदापि सहन करणार नाही, असा इशारा देत त्यांनी अन्याय, अत्याचाराविरुध्द समाजबांधवांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन केले. आदिवासींवरील अन्याय न थांबल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा दम त्यांनी सरकारला भरला.