लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली :अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जागृती येऊन वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याअंतर्गत पहिले एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आदिवासी शासकिय इंग्रजी माध्यमिक शाळेत बुधवारी घेण्यात आले.आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या पुढाकाराने जिल्ह्यात ठिकठिकाणी असे शिबिर घेतले जाणार आहे. यातील पहिले शिबिर गडचिरोलीत झाले. जादूटोणा विरोधी कायदा सांगून वैज्ञानिक दृष्टिकोनावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसह गडचिरोली विभागातील शासकिय व खासगी आश्रमशाळेतील विज्ञान विषयाचे शिक्षकही उपस्थित होते. विद्यार्थी केंद्रबिंदू धरून त्यांना धर्म-माणूस व अग्नीचा शोध व त्याचा मानवी जीवनातील उपयोग, विद्यार्थ्यांनी एकाग्रचित्त राहून अभ्यास कसा करावा, अंधश्रध्दा समाजात कशी रूजविल्या गेली यावर महाराष्ट्र युवा संघटक पंकज वंजारे यांनी विस्तृतपणे मार्गदर्शन केले.आपल्या जिल्ह्यात नरबळी, अंगात येणे, मंत्र-तंत्र हे कसे थोतांड आहे, भविष्य सांगणारे कसे समाजात खोटे बोलून लुटतात याबाबत महाराष्ट्र संघटक हरिभाऊ पाथोडे यांनी समजावून सांगितले. भूत-भानामती, अंगात येणे व मांत्रिकांचे थोतांड यावर प्रयोगासह मार्गदर्शन जिल्हा संघटक जगदीश बद्रे यांनी केले. संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्ष अश्विनी भांडेकर यांनी प्रश्नांचे समाधान केले.
आदिवासी विद्यार्थ्यांमधील अंधश्रद्धा दूर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:37 AM