गडचिरोली : मागील चार ते पाच दिवसांपासून वातावरण सातत्याने बदलत आहे. कधी थंडी, तर कधी कोरड्या वाऱ्यामुळे नागरिकांना विविध प्रकारचा शारीरिक त्रास होत आहे. वायरल फिव्हर व सर्दी, खोकल्या अशा तक्रारी वाढल्या आहेत, तर दुसरीकडे उबदार कपड्यांची मागणी वाढली आहे.
गडचिरोली येथील मुख्य बाजारपेठेतील मोठ्या दुकानांमध्ये नवनवीन प्रकारचे अत्याधुनिक उबदार कपडे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. लहान बालकांपासून वृद्धापर्यंत साऱ्यांच्याच मापाचे तसेच महिलांसाठीसुद्धा स्वेटर व उणी कपड्यांनी बाजारपेठ सजली आहे. इंदिरा गांधी चौक परिसरातील फुटपाथवर अनेकांनी उबदार कपड्यांची दुकाने लावली आहेत. महिला व बाल रुग्णालयासमोरील भागात स्वेटर घेताना अनेक महिला व पुरुष दिसून येतात. लहान मुलांना सर्दी व आजाराचा त्रास होऊ नये, याकरिता विशेष काळजी घेतली जात आहे. सायंकाळी व रात्री स्वेटर घालून झोपविण्यावर भर दिला जात आहे.