गडचिरोली : शहरातील पोटेगाव मार्ग निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जातो. या मार्गाने अनेक नागरिक फेरफटका मारण्यासाठी पहाटे व सायंकाळी जात असतात. परंतु पोटेगाव रस्त्याच्या दोन्ही बाजुुंनी घाणीचे साम्राज्य आहे.
पोर्ला बसस्थानकावर गतिरोधक उभारा
गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली - आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने हाकत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे.
पथदिवे नियमित सुरू ठेवण्याची मागणी
गडचिरोली : शहराच्या मुख्य तसेच अंतर्गत मार्गावरील पथदिवे अनेकदा रात्रीच्या सुमारास बंदस्थितीत असतात. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पथदिवे नियमित सुरू ठेवावेत, अशी मागणी होत आहे.
खरपुंडी मार्गाचे रूंदीकरण करा
गडचिरोली : खरपुंडी मार्गाचे रूंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या मार्गाचे रूंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष होत आहे.
काेरचीत विश्रामगृहाची मागणी कायम
कोरची : कोरची तालुक्याची लोकसंख्या व भौगोलिक विस्तारित क्षेत्राचा विचार करून कोरची येथे शासकीय विश्रामगृह आवश्यक आहे. तशी नागरिकांकडून अनेकदा मागणी करण्यात आली. सदर विश्रामगृहाची मागणी अद्याप प्रलंबितच आहे. त्यामुळे शासन, प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
दूध शीतकरण केंद्र सुरू करण्याची मागणी
अहेरी : तालुक्यातील आलापल्लीनजीक असलेल्या नागेपल्ली येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राची इमारत बेवारस स्थितीत आहे. लाखो रूपये खर्चून सदर इमारत बांधण्यात आली. मात्र, या ठिकाणी यंत्र सामग्री आणण्यात आली नाही. मागील दहा वर्षांपासून या इमारतीच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झाले आहे.
ग्रामीण स्मशानभूमींची दुरवस्था कायम
कुरखेडा : जिल्हा परिषद प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी ग्रामीण भागातील अनेक गावातील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही.
दुर्गम भागातील भ्रमणध्वनी सेवा ठप्प
एटापल्ली : तालुक्यातील दुर्गम भागातील भ्रमणध्वनी सेवा अनेक दिवसांपासून ठप्प आहे. करोडो रूपये खर्च करून अनेक ठिकाणी बीएसएनएल भ्रमणध्वनी सेवेचे मनोरे उभारण्यात आले. मात्र, सदर टॉवर रेंज राहात नसल्याने भ्रमणध्वनी सेवा ठप्प झाली आहे. या भागातील नागरिकांना इतरांशी संपर्क साधण्यासाठी उंच जागेचा आधार घ्यावा लागत आहे.
कुरखेडातील नळ जोडणी तपासा
कुरखेडा : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये घरगुती नळाला मोटारपंप लावून वरच्या मजल्यावर सर्रास पाणी खेचले जात आहे. यामुळे इतर नागरिकांच्या नळाला पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे नळ जोडणीची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. कुरखेडा शहरात अनेक ठिकाणी नळ पाईपलाईन लिकेज असल्याने पाण्याचा अपव्यय हाेत आहे.
पाणी टाकीची सुरक्षा वाऱ्यावर
गडचिरोली : पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गावांमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु या टाकीच्या सुरक्षेसाठी प्रशासन गंभीर नसल्याचे दिसते. शहरात पाण्याच्या सात टाक्या आहेत.
कोंबड बाजार सुरू
गडचिरोली : काेराेना संसर्गामुळे मंडई व नाट्य प्रयोग सुरू झाले नसले तरी अनेक ठिकाणी कोंबड बाजार भरविला जात आहे. त्यामुळे अनेक युवक दारूच्या आहारी जात आहेत. काेंबड बाजारावर सट्टा लावला जात असून, याकडे पाेलिसांचे दुर्लक्ष हाेत आहे.
पेट्रोलची अवैध विक्री
आष्टी : चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी पेट्रोलपंपावरून पेट्राेल नेतात. गावात अधिक दराने पेट्राेलची विक्री केली जात आहे.
दारूविक्री जाेमात
गडचिराेली : आरमाेरी मार्गावरील पाेर्ला गावात अनेक ठिकाणी दारूची विक्री केली जात आहे. सायंकाळच्या सुमारास येथे मद्यपींची वर्दळ दिसून येते. कारवाईकडे पाेलिसांचे दुर्लक्ष आहे. परिसरातील अनेक मद्यपी पाेर्लात जाऊन शाैक भागवित आहेत.
एकेरी वाहतुकीबाबत हालचाली नाही
गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चौकातून आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. सणासुदीच्या कालावधीत व आठवडी बाजाराच्या दिवशी रविवारला या मार्गावर वाहनधारकांची प्रचंड गर्दी असते. अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.
डुक्कर बंदोबस्ताकडे पालिकेचे दुर्लक्ष
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वॉर्डात डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. मात्र, पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकराच्या हैदोसाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
गोकुलनगर वस्तीत सुविधांचा अभाव
गडचिरोली : गडचिरोली नगर पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या गोकुलनगर लगत माता मंदिराच्या पलिकडे अनेक घरांची वस्ती गेल्या काही वर्षांपासून वसली आहे. अनेक कुटुंब या भागात वास्तव्यास आहेत. मात्र, सदर भागात पक्के रस्ते, नाली, पथदिवे आदी मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे.
तलाठी व ग्रामसेवकांची वानवा
एटापल्ली : अहेरी उपविभागाच्या एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा व अहेरी या पाचही तालुक्यात महसूल विभागांतर्गत येणाऱ्या तलाठी व ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी शेतकरी व नागरिकांची कामे खोळंबत असल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रीयीकृत बँकेची आवश्यकता
एटापल्ली : एटापल्ली हा विस्ताराने अतिशय मोठा तालुका आहे. या तालुक्यात सुमारे १९८ गावे आहेत. केवळ कसनसूर व एटापल्ली या दोनच ठिकाणी बँका आहेत. एटापल्ली येथे एसबीआय, सहकारी बँक व ग्रामीण बँकेची शाखा आहे. तालुक्याच्या विस्ताराच्या तुलनेत बँकांची संख्या कमी आहे. त्यामुळे अजूनही बहुतांश नागरिकांना बँकेचे आर्थिक व्यवहार माहीत नाहीत.
भामरागडतील गावे लाईनमनअभावी
भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे आहे. परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एका लाईनमकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे ते प्रत्येक गावाला सारखाच वेळ देऊ शकत नाहीत.
पेंढरी येथे गॅस एजन्सीची गरज
धानोरा : वन विभागामार्फत संयुक्त वन व्यवस्थापनाचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. पेंढरी परिसरातील जवळपास ९० टक्के कुटुंबांकडे गॅस आहेत. मात्र, गॅस एजन्सी केवळ धानोरा येथेच आहे. पेंढरी हे परिसरातील मोठे गाव आहे. या गावात गॅस एजन्सी दिल्यास नागरिकांसाठी सोयीचे होईल.
कुंपणाअभावी पिकांचे जनावरांकडून नुकसान
गडचिरोली : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने तार कुंपणाचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या तारांचा पुरवठा करण्याची मागणी आहे. शेत पिकांच्या संरक्षणासाठी सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना काटेरी तार पुरविणे आवश्यक आहे. जनावरांच्या त्रासामुळे अनेकांनी शेती सोडली आहे.
मोकाट जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा
आष्टी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्त्यांवर २० ते २५ मोकाट जनावरांचा कळप दिवसभर बसून राहतो. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. आष्टीच्या मुख्य चौकात मोकाट जनावरांचा ठिय्या असतो. चौकातून गडचिरोली, अहेरी, गोंडपिपरी येथून वाहने येतात.
नागोबा देवस्थानचे सौंदर्यीकरण करा
गडचिरोली : तालुक्यातील गोगाव व परिसरातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या गोगाव - दिभना मार्गावरील नागोबा देवस्थानच्या सौंदर्यीकरणाच्या कामास मंजुरी मिळाली आहे.
काॅम्प्लेक्स भागातील नाल्यांचा उपसा करा
गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरातील नाल्यांचा उपसा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. कॉम्प्लेक्स परिसर विस्ताराने फार मोठा आहे. त्यामुळे या ठिकाणी जादा मजूर गरजेचे आहेत.
वाहनांचा लिलाव करा
चामोर्शी : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेली वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणामुळे किंवा कागदपत्राअभावी पोलीस ठाण्यामध्येच ठेवली आहेत. ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार झाली आहेत. वाहने लिलाव केल्यास गरजू व्यक्तिंना याचा लाभ होईल.
थांब्याला झुडुपांचा वेढा
मूलचेरा : तालुक्यातील शांतीग्राम येथे प्रवासी निवारा बांधण्यात आला आहे. मात्र, या निवाऱ्याच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. निवाऱ्याला झुडुपांनी वेढले आहे. त्यामुळे प्रवासी निवाऱ्यात बसू शकत नाहीत. उन्हातच बसची वाट बघत बसावे लागते.
कर्जेलीला रस्ता नाही
जिमलगट्टा : छत्तीसगड राज्याच्या सीमलेगत असलेल्या कर्जेली गावात जाण्यासाठी रस्ता नाही. गावाच्या दोन्ही बाजूला नाले असून, या नाल्यांवर पूल नसल्याने पावसाळ्यात या गावाचा जगाशी संपर्क तुटतो. कर्जेली गावात जवळपास ७० कुटुंब वास्तव्याला आहेत.
सौरऊर्जेवरील नळ योजनांना घरघर
एटापल्ली : ज्या गावात विजेची सुविधा नाही. तसेच ग्रामपंचायतीची आर्थिक ऐपत नाही, अशा ग्रामपंचायतींच्या गावांमध्ये सौरऊर्जेवरील नळ योजना कार्यान्वित केल्या आहेत. मात्र, अनेक याेजना बंद आहेत.