गडचिरोली : शहरातील पोटेगाव मार्ग निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जातो. या मार्गाने अनेक नागरिक फेरफटका मारण्यासाठी पहाटे व सायंकाळी जात असतात, परंतु पोटेगाव रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी घाणीचे साम्राज्य आहे.
ग्रामीण भागातील वीज खांब धोकादायक
आलापल्ली : अहेरी तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावात अनेक ठिकाणी वाकलेले खांब असून ताराही लोंबकळत आहेत. यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे वाकलेले वीज खांब व लोंबकळलेल्या तारा सुरळीत कराव्यात, अशी मागणी होत आहे.
पशुपालन योजनांची जनजागृती करा
भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे. त्यामुळे या योजनांची जनजागृती करावी.
बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित
कुरखेडा : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचायस्तरावर करण्याचे निर्देश शासनाने दिले असले तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. ग्रा. पं. प्रशासनाच्या जनजागृतीअभावी ग्रामीण व दुर्गम भागातील बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित असल्याचे दिसून येते. परिणामी त्यांना शासनाच्या योजनाच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण हटवा
गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चौकातून आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. सणासुदीच्या कालावधीत व आठवडी बाजाराच्या दिवशी रविवारला या मार्गावर वाहनधारकांची प्रचंड गर्दी असते. अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. अतिक्रमणाची समस्या गंभीर झाली असून अतिक्रमण हटविण्याची मागणी आहे.
रस्त्यावर कचरा; कारवाई करा
देसाईगंज : घंटागाडी वॉर्डात फिरत असतानाही या घंटागाडीत कचरा टाकत नाही. उलट काही लोक तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कचरा टाकतात. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आहे.
लाहेरीत नवीन आराेग्य केंद्र इमारत बांधा
भामरागड : लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुरेशा इमारतीअभावी एकाच खोलीतून सुरू आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील अनेक रुग्ण औषधोपचारासाठी दररोज येतात. सदर आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे काम सुरू करावे.
मद्यपी वाहनचालकांवर कारवाई थंडबस्त्यात
गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
पेंढरी येथे गॅस एजन्सीची गरज
धानोरा : वन भागामार्फत संयुक्त वन व्यवस्थापनचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. पेंढरी परिसरातील ९० टक्के कुटुंबांकडे गॅस आहेत.
घरमालकांना नव्या भाडेकरूंची प्रतीक्षा
गडचिराेली : कोरोना संचारबंदीच्या कालावधीत गडचिराेली शहरासह जिल्ह्याच्या शहरी भागात भाड्याने राहणारे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे व विद्यार्थी स्वगावी परतले. तेव्हापासून बऱ्याच घरमालकांच्या खोल्या रिकाम्या आहेत. या घरमालकांना नव्या भाडेकरूंची प्रतीक्षा आहे.
रिक्त पदे भरण्याची मागणी
अहेरी : शासकीय कार्यालयात विविध पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या गतिमानतेवर परिणाम झाला आहे. रबी हंगामाचे दिवस सुरू आहेत. अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कार्यालयात येत आहेत. परंतु, महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामांवर परिणाम झाला आहे. यातील काही रिक्त पदे अनुकंपा तत्त्वावरील आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
जेनेरिक औषधसाठा वाढविण्याची मागणी
गडचिराेली : पंतप्रधान जनआरोग्य औषधी केंद्रामध्ये शासनाच्या सवलतीत औषधसाठा वितरित करण्यात येतो. मात्र, काही केंद्रात अत्यल्प प्रकारचा औषधसाठा उपलब्ध आहे. परिणामी अतिरिक्त पैसे देऊन रुग्णांना औषधांची खरेदी करावी लागत आहे. औषधसाठा वाढवण्याची मागणी आहे.
तुटलेले साईन बोर्ड दुरुस्त करा
कुरखेडा : शहरातील मुख्य मार्गावर बऱ्याच ठिकाणी शहरातील स्थानाबाबत साईन बोर्ड लावण्यात आले आहे. मात्र, ते अनेक ठिकाणी तुटले आहेत. त्याची त्वरित दुरुस्ती करावी. अनेक फलकांवरील गावाचे नाव लिहिले असल्याने समजण्यास अडचण जाते. त्यामुळे गावाचे नाव अंकित करावे, अशी मागणी होत आहे.
विशेष घटक योजनेतून वीज जोडणी करावी
आरमाेरी : परिसरातील अनेक गावांमधील काही वॉर्डांमध्ये अद्याप विद्युत पुरवठा झाला नाही. या वॉर्डांमध्ये प्रामुख्याने वंचित घटकांतील नागरिक राहतात. त्यामुळे वीज जोडणीपासून वंचित असलेल्या अनुसूचित जातीमधील कुटुंबीयांनी विशेष घटक योजनेअंतर्गत वीज पुरवठा करावा, अशी मागणी वीज कंपनीकडे केली आहे.
तलावातील अतिक्रमण हटवा
आलापल्ली : आलापल्ली येथील तलावाच्या सभोवताल अतिक्रमणांचा विळखा निर्माण झाला असून विविध प्रकारच्या वनस्पतींनी या तलावाला वेढा घातला आहे. दुर्लक्षितपणामुळे देखभालीअभावी या तलावाचे रूपांतर आता बोडीत झाले आहे. येथील भामरागड मुख्य मार्गावर असलेल्या एकमेव मामा तलावाच्या दुरुस्तीकडे प्रशासकीय यंत्रणेचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालावी
एटापल्ली : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, वाहनांद्वारे प्रदूषणात वाढ होत असून प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. सातत्याने मागणी करूनही कारवाई हाेत नाही.
केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा
काेरची : पंतप्रधान जनधन योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, पीकविमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, समृद्धी सुकन्या योजना, उज्ज्वला गॅस योजना आदी योजना राबविल्या जात आहेत. मात्र अनेकांना या योजनांची माहिती नसल्याने गरीब लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिकाधिक जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शासकीय इमारतीची पुनर्बांधणी करावी
गडचिराेली : शहरातील अनेक शासकीय कार्यालयांच्या इमारतींची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. ही कार्यालये जीर्ण झाल्याने बऱ्याच ठिकाणी गळती लागली आहे; परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी शासकीय अधिकाऱ्यांसह सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कार्यालयातील तक्रारपेट्या गायब
आरमाेरी : शासकीय कार्यालयांत काही वर्षांपूर्वी तक्रारपेट्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, बहुतांश कार्यालयांतील तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत. दरम्यान, तक्रार करण्यासाठी सामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पीक विम्याच्या रकमेची प्रतीक्षा
गडचिराेली : जिल्ह्यातील शेकडो कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता; पण विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. यंदाच्या पावसाळ्यात पूर आल्याने उत्पन्नात घट झाल्याने शेतकरी विम्याची रक्कम केव्हा मिळेल, असा प्रश्न विचारला जात आहे.
शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी
चामाेर्शी : आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी बांधवासाठी विविध योजना राबविण्यात येतात. यंदा कोरोनामुळे योजनांसाठी निधी मिळाला नाही. त्यामुळे तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात योजनाच पोहोचल्या नाही. राज्य शासनाने निधीची तरतूद करून जिल्ह्यासाठी देण्याची मागणी आदिवासी संघटनांनी निवेदनातून केली आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
अत्यल्प बससेवेमुळे प्रवासी त्रस्त
चामाेर्शी : मूल मार्गावर अत्यल्प बसफेऱ्या असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या मार्गावर बससेवा वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत
देसाईगंज : जिल्ह्यातील काही गावांत मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू आहे. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविले जात आहे. संबंधित विभागाने अवैध वाहतुकीवर आळा घालावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
बीएसएनएलमधील रिक्त पदे तत्काळ भरा
गडचिराेली : जिल्ह्यातील अनेक दूरभाष केंद्रातील प्रमुख अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथील कारभार रामभरोसे सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी अनेक तांत्रिक अडचणी आहेत. यामुळे त्या सोडविण्यासाठी रिक्त पदे भरावीत, अशी मागणी केली जात आहे.
पाणीपुरवठ्याकडे लक्ष देण्याची मागणी
धानाेरा : तालुक्यातील अनेक गावांतील जलकुंभ शोभेची वास्तू ठरले आहेत. पाणीपुरवठा योजना मंजूर असतानाही कामेच सुरू झाली नाही. याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर होत आहे.
मोकाट जनावरांचा चौकाचौकांत ठिय्या
आष्टी : शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला. ही जनावरे रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रात्रीच्या सुमारास वाहनधारकांचा अपघात होण्याचा धोका आहे. मोकाट जनावरांचा नगर परिषदेने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली.
वाहनधारकांना शिस्त लावणे गरजेचे
गडचिराेली : शहराची मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चाैकात असून, अनेक दुकाने आहेत; परंतु काही ग्राहक स्वत:ची वाहने पार्किंगमध्ये न ठेवता रस्त्यावरच लावतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. संबंधित विभागाने रस्त्यावरील पार्किंग हटविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यासाठी निवेदनही दिले आहे. मात्र, उपाययोजना करण्यात आली नाही. कारवाई हाेत नसल्याचे दिसून येत आहे.
कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाचा खाे
चामोर्शी : शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, अशी मागणी दुर्गम भागातील नागरिकांनी केली आहे. जिल्हाभरातील तलाठी, शिक्षक, गामसेवक व आराेग्य कर्मचारी ये-जा करतात. त्यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांची दाखल्यासाठी पायपीट होत आहे. सध्या तलाठ्यांनी रहिवासी व जातीचे दाखले देणे बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे तलाठ्यांचे अपडाऊन वाढले.
नाली उपशाचे काम ढेपाळले
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय, शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.
बसथांब्याची दुरवस्था वाढली
सिरोंचा : अहेरी ते गडचिरोली आगारातून सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागात बसेस सोडल्या जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र, या निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाली असल्याने त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. बऱ्याच प्रवासी निवाऱ्यांचे टिनपत्रे वादळाने उडाली आहेत. भिंती पिचकाऱ्यांनी रंगल्या असून, घाणीचे साम्राज्य वाढलेे आहे.
अतिक्रमणांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
अहेरी : शहरात रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. प्रशासनाने सदर अतिक्रमण तत्काळ काढावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा मागणी करण्यात आली. मात्र, दुर्लक्षच झाले आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाकडून अतिक्रमणधारकांवर कारवाई होताना दिसून येत नाही.
हागणदारीमुक्ती कागदावरच
विसोरा : बहुतांश नागरिकांकडे शौचालय आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापरच करीत नाहीत. परिणामी शौचालय निकामी झाले आहेत. शौचालयाचा वापर न झाल्याने हागणदारीमुक्त गाव निर्माण करणे अडचणीचे झाले आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिक लाेटा घेऊन रस्त्याच्या कडेला जातात.
अल्पवयीन चालकांवर कारवाई हाेईना
आरमोरी : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालविली जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, या भरधाव वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.