गडचिराेली : ८ ऑगस्ट २०१६ च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र.२ ला अनुसरून हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना काम देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र कास्ट्राईब शासकीय कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिराेलीच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना १८ जानेवारी राेजी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष विनाेद सेलाेेटे यांच्यासह इतर पदाधिकारी व हंगामी कर्मचारी उपस्थित हाेते. निवेदनात म्हटले आहे की, दहावी नापास फवारणी कर्मचाऱ्यांनासुद्धा समान काम देण्यात यावे. आजघडीला गडचिराेली जिल्ह्यात अनेक प्राथमिक केंद्रांमध्ये रनर व नियमित क्षेत्र कर्मचारी यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे दहावी नापास हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांनासुद्धा आरटीडब्ल्यूप्रमाणे १७९ दिवसांचे काम देऊन त्यांना सहकार्य करावे. दहावी पास व नापास अशा सर्व हंगामी कर्मचाऱ्यांना १७९ दिवस काम देऊन या कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करावा, असे निवेदनात म्हटले आहे.