लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्यांच्या निवारणार्थ शासनाला २९ एप्रिल २०२० रोजी पाठवलेल्या नोटीसनुसार १३ मे २०२२ रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमाेर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान शिक्षण विभाग व वेतन पथकाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक आश्वासन दिले. त्यामुळे आता शाळांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सातव्या वेतनाचे प्रलंबित हप्ते अदा करणार आहेत. जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाच्या उदासीनतेचा फटका बसलेला असून कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तत्काळ निधी मंजूर करावा, यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने धरणे देण्यात आले. या धरणे आंदोलनाला वेतन पथक अधीक्षक दिलीप मिछान यांनी भेट देऊन त्यातील दोन मागण्या मार्गी लागल्या असून, फेब्रुवारी महिन्याची वेतन देयके वेतन पथकात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला, दुसरा आणि तिसरा हप्ता जून महिन्यात देण्यात येणार असल्याचे उपस्थितांना सांगितले. यावेळी मागण्यांचे निवेदन उपशिक्षणाधिकारी रमेश उचे यांच्यामार्फत शालेय शिक्षण सचिव तसेच शिक्षण आयुक्तांना पाठविण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, बी.बी.पारधी, आर. एस. मेकलवार, किशोर पाचभाई, अजय वर्धालवार, पुरुषोत्तम करकाटे, किशोर राऊत आदी सहभागी हाेते.